– मुंबईत भव्य सोहळा; उदित नारायण यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सौंदर्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर जागतिक मंचावर आपली चमक दाखवणाऱ्या शेगावच्या सुपुत्री, मिस एशिया वर्ल्ड 2025 विजेती गायत्री रोहनकर हिचा हिंदुस्तान रत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे भव्य सन्मान करण्यात आला. मुंबई ग्लोबल आणि मुंबई इव्हेंट कंपनीतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार 18 जुलै रोजी मुंबईत आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध सिने पार्श्वगायक उदित नारायण, तसेच राजकुमार तिवारी, टिनू वर्मा यांच्यासह फिल्मसिटीतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान गायत्रीच्याहस्ते देण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना गायत्रीच्या सन्मानार्थ संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेले. उपस्थित मान्यवरांनी उभे राहून तिच्या यशाला दाद दिली. गायत्री रोहनकरने आजवर विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेऊन एकूण 18 प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. नुकत्याच दुबईत झालेल्या एशिया वर्ल्ड 2025 स्पर्धेत विजेतेपद मिळवत तिने भारताचे नाव उज्ज्वल केले. शेगावसारख्या छोट्या शहरातून जागतिक स्तरावर पोहोचलेली गायत्री रोहनकर आज देशभरातील तरुणींना आत्मविश्वास, मेहनत आणि धैर्याने स्वप्नं पूर्ण करण्याची प्रेरणा ठरत आहे.