– डॉ. विकास मिसाळ, सतिश पाटील भुतेकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बांधकाम विभागाकडून ठेकेदारावर ‘प्रेशर’ वाढले!
– रखडलेले रस्ताकाम तातडीने पूर्ण करा, अन्यथा पुन्हा आंदोलन उभारू – डॉ. विकास मिसाळ यांचा इशारा
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून, हे काम वेगाने करण्यात यावे, तसेच हा रस्ता सद्या जीवघेणा बनलेला असल्याने ‘धोक्याचे स्पॉट’ तातडीने दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी केली होती. या शिवाय, या रस्त्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील वारंवार वृत्त प्रकाशित करून हा गंभीर व धोकादायक बनलेल्या रस्त्याचा प्रश्न उचलून धरला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने संबंधित ठेकेदाराला तंबी देऊन या रस्त्याच्या कामाची डागडुजी करत, रस्ताकामालादेखील सुरूवात केली आहे.
मलगी ते इसरूळ या रस्ताकामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी वारंवार आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे, तसेच त्यांच्याच प्रयत्नातून तत्कालीन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू झाले होते. परंतु, सत्ता बदल होताच संबंधित ठेकेदाराला निधीच दिला जात नसल्याने या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. मलगी ते देऊळगाव घुबेपर्यंत रस्ता झाला असून, देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्याची पूर्णपणे वासलात लागली आहे. एक तर संथगतीने काम सुरू आहे, दुसरीकडे या रस्त्याची अक्षरशः नागाटी बनली आहे. या रस्त्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असून, वाळूतस्कर हे लोकांच्या जीवावर उठले असतानाच रस्तादेखील जीवघेणा बनला आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह डॉ. विकास मिसाळ, सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी वारंवार आवाज उठवून आक्रमक भूमिका घेतली आहे. सरपंच सतिश पाटील भुतेकर यांनी तर मागील आठवड्यातच हा रस्ता विद्यार्थी, व प्रवासी यांच्या जीवावर कसा उठला, याचा व्हिडिओच प्रसारित केला होता. तसेच, डॉ. विकास मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना पुन्हा आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे, अखेर या रस्त्याची डागडुजी सुरू झाली असून, ‘धोकादायक स्पॉट’ दुरूस्त केले जात आहेत. तथापि, हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्यात यावा, व संबंधित ठेकेदाराची निधीची अडचण बांधकाम विभागाने तातडीने दूर करावी, अशी मागणीही डॉ. विकास मिसाळ यांनी केली आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत संबंधित ठेकेदाराला देयके अदा केली जात नसून, त्यामुळे निधीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. तरीदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनिल बडे यांच्या प्रयत्नामुळे व नागरिकांच्या समस्या लक्षात घेता, या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला मोठे ग्रहण लागले असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत या भागातील नागरिकांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे हात बळकट केले नाही तर मात्र रस्त्याचे काम आणखी रखडण्याची चिन्हे आहेत, अशी या भागातील जनभावना आहे.