– समाजाच्या विविध प्रश्नांवर होणार चर्चा; समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
चिखली (रंजना मोरे) – धनगर समाजाच्या विविध प्रश्नांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देऊन त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारी अशी ओळख असलेल्या धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघाची संयुक्त जिल्हा बैठक रविवारी (दि.२०) रोजी चिखली येथे दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात धनगर समाजबांधवांनी, युवकांनी व महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर समाज महासंघाचे तालुका अध्यक्ष कडूबा गवारे यांनी केले आहे.
या बैठकीला धनगर समाज महासंघाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्रीरामभाऊ पुंडे, विभागीय अध्यक्ष शरद वसतकर, अहिल्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अलका गोडे, अशोकराव देवकते, सुनील मतकर यांच्यासह घाटावरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये घाटावरील सर्व तालुक्यांमध्ये नवीन नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच, समाजाच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे, तरी इच्छुक पदाधिकार्यांनी तसेच समाजबांधवांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.