– मुंबईतील बैठकीत राजन पाटील यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला यश
हेमंत चौधरी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आले आहे. राजन पाटील यांना भाजपात ओढण्याचा राज्यातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचा डाव यानिमित्ताने उधळला गेला असून, सोलापूर जिल्ह्याची सर्व जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व मोहोळ विधानसभा मतदारसंघाची सर्व जबाबदारी राजन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सोपावली आहे. पाटील यांच्याशी शरद पवार यांनीदेखील दूरध्वनीवरून संपर्क साधत, त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे सूत्राने सांगितले आहे. मोहोळ मतदारसंघात राजन पाटील सांगतील तोच उमेदवार दिला जाईल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निर्णयही पाटीलच या मतदारसंघात घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांना भाजपात ओढण्यासाठी राज्य भाजपचा वरिष्ठ नेता प्रयत्न करत होता. पाटील यांच्या मनाचीही घालमेल चालू दिसत होती. ते भाजपात जाणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत होते. ही कुणकुण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याही कानावर गेली होती. त्यानुसार, त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्याशी चर्चा करण्याचे आदेश अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ यांना दिले होते. त्यानुसार, आज मुंबई येथे या तीनही नेत्यांनी राजन पाटील यांच्यासह बळीरामकाका साठे व आ. यशवंत माने यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी राजन पाटील यांची नाराजीही या नेत्यांनी दूर केल्याचे खास सूत्राने सांगितले आहे.
सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय वादंगावार या बैठकीत अखेर पडदा पाडला गेला. सोलापूर जिल्हाची सर्वस्वी जबाबदारी तसेच आगामी निवडणुकांमध्ये सर्व निर्णय हे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे घेतील. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही राजन पाटील व आमदार यशवंत (तात्या) माने यांच्याकडेच राहील, असे या बैठकीत ठरले.
सोलापूरच्या राजकारणात भाजपच्या वरिष्ठ नेत्याने अलिकडे फारच लक्ष देण्यास सुरुवात केली असून, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सोलापूर महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मोहिते पाटील यांच्यासह इतर नेत्यांवर त्यासंदर्भात जबाबदारीही देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोठे नेते गळाला लागतात का, याची चाचपणीही केली जात असल्याचे राजकीय सूत्राचे म्हणणे आहे.
