– बंडखोरांपैकी सहा आमदार शिवसेनेत परतण्याची शक्यता?
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना मदत देण्याची फसवी घोषणा सरकारकडून झाल्यानंतर, त्यावर कडाडून टीका करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक ‘मातोश्री’वर दाखल होत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांत बराचवेळ चर्चा सुरु होती. परंतु, या चर्चेचा तपशील दोन्ही बाजूने गोपनीय ठेवण्यात आला. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला विधीमंडळात घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने नेमकी काय रणनीती आखली? याचा उलागडा होऊ शकला नाही.
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना झालेली अटक व शिवसेनेत पडलेली उभी फूट, या दोन्ही मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने मौन बाळगले होते. त्यानंतर आज अचानक विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, व सुनील तटकरे हे मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचा अधिकृत तपशील दोन्हीही नेत्यांनी दिलेला नाही. परंतु, बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, हे नेते प्रथमच भेटले आहेत.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची अटक व सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या याचिकांवरील सुनावणी या संदर्भात, या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्राने सांगितले आहे. राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे हे एकटे पडले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाहीही यावेळी दिली. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकांच्या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढाव्यात, असा दोन्ही नेत्यांचा विचार आहे. याबाबतची शक्यताही यावेळी चाचपडून पाहण्यात आली, असेही सूत्राने सांगितले.
दरम्यान, या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात वादग्रस्त नेत्यांना स्थान मिळाले आहे. पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर भर देण्यासह अतिवृष्टी व पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत असल्याने, सरकारला घेरण्याची रणनीतीही या बैठकीत निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.