– रस्ता न दिल्यास बैलगाड्यांसह महामार्ग बंद करण्याचा इशारा!
– वाघजाईच्या शेतकर्यांची तडाखेबंद घोषणा; दीड महिना पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म!
– १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास महामार्गावर गुरेढोर्यांसह आंदोलन!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – विकासाच्या नावाखाली समृद्धी महामार्गाने जिथं शेतकर्यांची जमीन घेतली, तिथेच आता त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ताही हिरावून घेतला गेला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई येथील शेतकर्यांची शेलगाव राऊत शिवारातील शेती समृद्धी महामार्गामुळे दोन भागांत विभागली गेली आहे. पण, शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता न दिल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
विक्रम झोटे आणि इतर शेतकर्यांनी ३० जून रोजी उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा यांच्याकडे आक्रोशपूर्ण निवेदन सादर करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, ‘पंधरा दिवसांत रस्ता करून न दिल्यास आम्ही नाविलाजाने समृद्धी महामार्गावर बैलगाड्या, गुरेढोरे घेऊन उतरू. महामार्ग ठप्प करू, आणि त्याचे संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल!’ शेतकर्यांचे म्हणणे आहे की, रस्त्याबाबत दीड महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे. स्थळ पंचनामा झाल्याला एक महिना उलटूनही प्रशासन केवळ आश्वासनावर वेळ मारत आहे. शेतीच्या हंगामात रस्ता बंद असल्याने मशागत, सिंचन, पीकपेरणी यावर मोठा परिणाम होत असून शेतकर्यांचे आर्थिक नुकसान सुरू आहे.
——–
– समृद्धी महामार्गाने रस्ता घेतल्यावर पर्यायी मार्ग का दिला नाही?
– पंचनामा होऊनसुद्धा काम का थांबले?
– शेतकर्यांच्या तळमळीची दखल कोण घेणार?
——
शेतकर्यांनी निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायदे, जिल्हा पोलीस अधीक्षक, व स्थानिक किनगावराजा पोलीस ठाण्याला दिल्या आहेत. या आंदोलनाचा झटका थेट एमएसआरडीसी आणि जिल्हा प्रशासनाला बसणार असल्याचे स्पष्ट दिसते. सदर निवेदनावर विक्रम अभिमान झोटे, राधाकिसन सानप, विष्णु बाळाजी सानप, भगवान सानप, पंढरीनाथ सानप यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या सह्या आहेत. जर प्रशासनाने पंधरा दिवसांत रस्ता दिला नाही, तर वाघजाई ते किनगावराजा समृद्धी महामार्ग पूर्णतः ठप्प होईल, हा शेतकर्यांचा इशारा आहे तरी प्रशासनाने ही घटना हलकासा न मानता गंभीरतेने घ्यावा लागेल.