– मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटी; शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त; पायाभूत सुविधांनाही जबर तडाखा!
– आमदार सिद्धार्थ खरात यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी!
– तात्काळ पंचनामे करून नुकसानीचा प्रस्ताव द्या; पालकमंत्री मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – मेहकर व लोणार तालुक्यामध्ये २५ व २६ जूनरोजी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला असून, जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. तसेच, पायाभूत सुविधांनाही मोठा तडाखा बसला आहे. सदर नुकसानीची आपण स्वतः पाहणी करून आढावा घ्यावा व नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच ५०० कोटीचे विशेष पॅकेज मंजूर करावे, अशी मागणी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आज, दि. १ जुलैरोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांना दिले असता, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, मेहकर व लोणार तालुक्यात सरासरी २१२ मिमी पाऊस पडला. मेहकर तालुक्यातील काही भागात हा पाऊस २२७ मिमीपर्यंत कोसळला. या पावसामुळे नदी, नाल्यांना मोठे पूर आल्याने शेतजमिनी खरडून गेल्या तर काही शेतात दगड येऊन पडल्याने कायमस्वरूपी शेती निकामी झाली. केलेली पेरणी पूर्णतः वाया गेली असून, गाळ साचल्यामुळे शेती करणे अडचणीचे झाले आहे. बोअरवेल, विहिरी, सोलर पंप, पाईपलाईन आदींचे मोठे नुकसान झाले तर जनावरेदेखील वाहून गेली. काही घरात पाणी शिरले असून, इतरही मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या धो धो पावसामुळे दोन्ही तालुक्यात आधीच मर्यादित असलेल्या पायाभूत सुविधांनाही मोठा तडाखा बसला आहे. अनेक शेतरस्ते, विद्युत पोल, विद्युत तारा, केबल्स, विविध यंत्रणांनी केलेले रस्ते, पूल, पाझर तलाव, कालवे, समृद्धी महामार्ग, शेततळे आदींचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तात्काळ नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली असून, संबंधितांना पंचनामे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. महसूल विभागाच्या २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत नुकसान भरपाई देण्याबाबत सर्वेक्षण सुरू आहे, परंतु या ढगफुटीसदृश पावसामुळे झालेले नुकसान हे नियमित मदतीत बसणारे नसून, यासाठी अतिरिक्त विशेष पॅकेजची गरज आहे. याच शासन निर्णयानुसार जर नुकसान जास्त असेल तर संबंधित विभागाकडून नुकसानीबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करून मदत व पुनर्वसन विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळासमोर सादर करता येतो. ही तरतूद लक्षात घेऊन तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी आपण सदर नुकसानी भागाचा दौरा करून आढावा घ्यावा व नुकसानीसाठी किमान ५०० ते ७०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी विनंतीही सदर निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांची भेट घेतली असता, त्यांनी नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना दिले आहेत.