– विद्याताई पडवळ यांच्या मुखोद्गत ग्रंथपठणाचा भक्तांना आध्यात्मिक लाभ; ९५१ भक्तांचा सहभाग!
देऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – देऊळगावराजा तालुक्यातील मौजे कुंभारी येथे श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे भव्य आणि भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ठाणे येथील विद्याताई पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचे आयोजन, ज्यामध्ये गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक वाचन भक्तांनी भक्तिभावाने केले.
कार्यक्रम स्थळी सुंदर फुलांची आरास, दीपमालिका आणि गजानन महाराजांचा देखावा अतिशय श्रद्धेने सजविण्यात आला होता. पारायण व्यासपीठावर विद्याताई पडवळ यांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन दिले. त्यांनी ग्रंथातील कथा, त्यातील संदेश, तसेच गजानन महाराजांच्या कार्याचे महत्त्व भावनिक आणि समर्पणशील शैलीत उलगडून सांगितले. या सोहळ्यात ९५१ हून अधिक भक्त सहभागी झाले होते. महिला व पुरुष भक्तांनी पारायण पुस्तिकेच्या सहाय्याने एकरूप होऊन सामूहिक ग्रंथपठनाचा व भक्तिभावाचा अनुभव घेतला. कार्यक्रमादरम्यान सत्संग, प्रवचन, भजन, नामस्मरण यांसारख्या धार्मिक उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. विविध वयोगटातील भक्तांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाचे स्वरूप अधिक भक्तिभावपूर्ण झाले. या अध्यात्मिक सोहळ्याचे यशस्वी आयोजन अमोल बालाप्रसाद बंग यांनी केले. सोहळ्याच्या यशात गावातील गजानन महाराज भक्तपरिवारानेही मोलाचा सहभाग दिला. हा पारायण सोहळा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा एक जिवंत अनुभव ठरला.