– माजी आमदार सानंदांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाआधीच ना. आकाश फुंडकरांनी डाव साधला!
– माजी जिल्हा परिषद अध्यक्षपती सुरेश वनारेंसह दिग्गजांचा काँग्रेसला ‘हात’!
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकोल्यात भाजपात प्रवेश!
बुलढाणा/अकोला (बाळू वानखेडे) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे आधीच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात काँग्रेस काहीशी खिळखिळी होत असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा उद्या, दि. १२ जूनरोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होत असतानाच, कामगार मंत्री तथा खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांचा राजकीय डावही यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षपती तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश वनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर यांच्यासह अनेकांनी आज, दि. ११ जूनरोजी अकोला येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानिमित्ताने काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना जिल्ह्यातच धक्क्यावर धक्के बसत असल्याचे दिसून येत आहे.
दिलीपकुमार सानंदा हे तीन टर्म काँग्रेसच्या तिकिटावर खामगाव मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. काँग्रेससह नेत्यांवर आपला राग नाही, परंतु कार्यकर्त्यांचे भले करायचे आहे, यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत, असे त्यांनी सांगितले असून, उद्या, दि. १२ जून रोजी त्यांचा खामगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. याची गंभीर दखल मंत्री आकाश फुंडकर यांनीही घेतल्याचे दिसून येत असून, त्यांनीही राजकीय यशस्वी डाव टाकल्याची चांगलीच चर्चा होत आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे यांचे पती तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश वनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेशसिंह तोमर यांच्यासह जलंब सरपंच मंगलाताई घोपे, सरपंच पती उत्तम घोपे, हिंगणा कारेगावचे माजी सरपंच भरतसिंह चव्हाण, बोरजवळा सोसायटी अध्यक्ष मधुकरजी तोमर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष बबलू नरवाडे, अनिकेतसिंह तोमर, नागेश बोराडे पोरज व आशीष देशमुख यांनी आज, दि.११ जूनरोजी अकोला येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकरसह मान्यवर उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच काँग्रेसला गळती लागल्याचे दिसून येत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ झाल्यापासून स्वजिल्ह्यातच काँग्रेसला खिंडार पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकल्याचे बोलले जात आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडण्याची घोषणा केल्यानंतर उर्वरित पदाधिकारी, कार्यकर्ते काहीसे सैरभैर झाल्याचे बोलले जात आहे. आज भाजपात प्रवेश केलेले बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते हे माजी आमदार सानंदा समर्थक होते. नवीन काँग्रेस तालुकाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्याशी त्यामुळे त्यांचे कदाचित फारसे सख्य नसावे, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतला असावा, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे, तर काँग्रेस पक्षाने सर्व काही देऊनही ऐन संकटकाळी पक्ष सोडल्याने निष्ठावंत कार्यकर्ते देखील संताप व्यक्त करत आहेत.