– वरूड येथील जोशी कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
– शेततळ्यात पाण्यावर तरंगतांना आढळले मृतदेह
जाफ्राबाद (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील वरूड गावातील तीन चिमुकल्यांचा कोनड बुद्रूक शिवारातील एका शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. कालपासून ही तीनही चिमुकले बेपत्ता झाली होती. त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर जाफ्राबाद पोलिस ठाण्यात त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासही सुरू केला होता. परंतु, आज सकाळी कोनड बुद्रूक शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात या तीनही बालकांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी हे मृतदेह बाहेर काढून शवपरीक्षणासाठी रवाना केले होते. या दुर्देवी घटनेने वरूड येथील जोशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हा प्रकार पोहोताना बुडून मृत्यू आहे, की घातपात? याचा तपास जाफ्राबाद पोलिस करत आहेत. मृतांमध्ये दोन सख्खे भावंडे आणि एक चुलत भाऊ असून, सर्वजण वरूड, ता. जाफ्राबाद येथील रहिवासी आहेत.
वरूड येथील जोशी कुटुंबीयांतील तीन चिमुकले काल सकाळ साडेदहा वाजता डौलखेडा रोडवरील महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते, तेव्हापासून बेपत्ता होते. ते सायंकाळपर्यंत घरी परतले नाही तेव्हा जाफ्राबाद पोलिसांत तक्रारही दाखल झाली होती, तसेच या तिघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. परंतु, काल रात्रीपर्यंत ते घरी न आल्याने तसेच त्यांचा काहीही शोध न लागल्याने पोलिस, सामाजिक कार्यकर्ते व त्यांचे नातेवाईक शोधाशोध करत होते. नजीकच्या बुलढाणा व जालना जिल्ह्यांतील गावांतही शोधाशोध सुरू होती. यश अनिल जोशी (वय १४), दीपाली रमण जोशी (वय ९), आणि रोहन रमण जोशी (वय ७) अशी या चिमुकल्यांची नावे असून, हे तिन्हीही मुले एकाच कुटुंबातील आहेत. दोघे सख्खे भावंडं असून, एक चुलतभाऊ आहे. काल, दि. २ जूनरोजी सकाळी हे तिघे भावंडे ओलांडा महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळ झाली तरी ते घरी परतलेच नाहीत. त्यांच्या अचानक गायब होण्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनीदेखील अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधाशोध सुरू केली. पण काहीच तपास लागला नाही. मात्र, आज, दि. ३ जूनरोजी सकाळी कोनड बुद्रूक शिवारातील सुभाष परिहार यांच्या शेततळ्यात तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. शवपरीक्षणासाठी हे मृतदेह ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. या दुर्देवी घटनेने वरूड येथील जोशी कुटुंबीयांवर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता. तसेच, परिसरातही हळहळ व्यक्त केली जात होती.
यश अनिल जोशी हा मुलगा खामगाव येथे शिक्षणासाठी असतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो वरूड येथे आला होता. येत्या 10 तारखेला तो खामगावला परत जाणार होता. परंतु, त्या अगोदरच त्याच्यावर काळाने घाला घातला.