– गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे २१ मोबाईल हुडकले; चोरट्यांवर कारवाईसह मोबाईलही जप्त!
– ठाणेदार संग्राम पाटील यांच्याहस्ते मूळ मालकांना मोबाईल परत!
चिखली (राजेश लोखंडे) – चिखली पोलिस ठाणेहद्दीत मोबाईल चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला होता. गर्दीच्या ठिकाणावरून हातोहात मोबाईल लंपास केले जात होते. या मोबाईल चोरट्यांना रोखण्यासाठी ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलिस अमलदार विजय किटे, सुनील राजपूत व महिला पोलिस अमलदार रूपाली उगले यांचे विशेष पथक नेमले होते. या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल १० मोबाईल व चोरटे जेरबंद केले असून, जप्त केलेल्या या मोबाईलची किमंत दोन लाख ५७ हजार रूपये इतकी आहे. मूळ मालकांना हे मोबाईल ठाणेदार पाटील यांच्याहस्ते परत देण्यात आल्यानंतर त्यांच्या चेहर्यावर हसू उमटले होते.
चिखली पोलिस ठाणेहद्दीत बसस्थानक, बाजारपेठ, देवी मंदीर, व गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल लंपास केले जात होते. मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाल्यानंतर त्याची गांभीर्याने दखल घेऊन ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलिस अमलदार विजय किटे, सुनील राजपूत, रूपाली उगले यांचे विशेष पथक स्थापन केले.
तसेच, या पथकाला मोबाईलच्या तपासकामी महत्वपूर्ण सूचना दिल्या. त्या आधारे, तसेच गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या विशेष पथकाने विविध कंपन्यांचे २१ मोबाईल किमत दोन लाख ५७ हजार रूपये हस्तगत केले. तसेच, चोरट्यांच्याही मुसक्या आवळून कारवाई केली. हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या प्रती समाधान व्यक्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संग्राम पाटील व त्यांच्या विशेष पथकाने केली.