– सरपंच संतोष बोर्डे यांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा
– चिखली बीडीओंनी तात्काळ उपाययोजना न केल्या १० तारखेपासून आमरण उपोषण
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेळगाव आटोळ ग्रामपंचायत मध्ये १५ व्या वित्त आयोगाचा कोट्यवधी रूपयांचा निधी तांत्रिक अडचणीमुळे शिल्लक पडून असल्याने गावातली विकासकामे खोळंबली आहेत. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भातील तांत्रिक अडचण तात्काळ दूर करून द्यावी, किंवा चेकद्वारे व्यवहार करण्याची परवानगी द्यावी, अन्यथा शेळगाव आटोळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येईल, असा इशारा सरपंच संतोष बोर्डे यांनी प्रशासनाला दिला आहे.
शेळगाव आटोळ, ता. चिखली येथील ग्रामपंचायतीला २०२०-२१ पासून १५ व्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त होत असून, आतापर्यंत जवळपास एक कोटी रुपयांच्या वर निधी प्राप्त झाला आहे. आज रोजी शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून नवीन सिमेंट रस्ता बांधकाम, नवीन नाली बांधकाम, नावीन आरओ फिल्टर इत्यादी २० लक्ष रूपयांचे विकास कामांची ई निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेशसुद्धा दिले आहेत. परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शासनाच्या ई-ग्राम स्वराज पोर्टलवरील इयर बुक क्लोजिंग होत नसल्याने सरपंच आणि सचिव यांची डिजिटल स्वाक्षरी रजिस्टर होत नाही, आणि त्यामूळे विकसकामांसाठी निधी खर्च करता येत नाही. यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील उपययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष बोर्डे यांनी ई-ग्राम स्वराज पोर्टलवरील तांत्रिक अडचण तात्काळ दूर करण्यात यावी, किंवा जोपर्यंत तांत्रिक अडचण दूर होणार नाही, तोपर्यंत चेकद्वारे व्यवहार करण्याची परवानगी द्यावी, जेणे करून गावातील विकासकामांना सुरुवात करता येईल, अन्यथा दिनांक १० जून २०२५ पासून शेळगाव आटोळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, आणि यामुळे होणार्या परिणामास सर्वस्वी आपण जबाबदार असाल, अशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांना दिले आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनाही या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने गटविकास अधिकारी यांनी तातडीने ही समस्या सोडवावी, अशी मागणीही पुढे आली आहे.