– संतप्त जमावाने पेटवून दिले टिप्पर!
– वाळूतस्कर सर्वसामान्य लोकांच्या जीवावर उठले; पोलिस अन् महसूल प्रशासनाच्या डोळ्यावर गेंड्याची कातडी!
बुलढाणा/जळगाव जामोद (राजेश लोखंडे) – भरधाव धावणार्या रेतीच्या टिप्परने झाडाखाली बसलेल्या दोन नागरिकांना चिरडले. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त ग्रामस्थांनी अपघातग्रस्त टिप्पर पेटवून दिले. वाळूतस्कर लोकांच्या जीवावर उठले असताना महसूल व पोलिस प्रशासन मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून बसले आहे.
जळगाव जामोद तालुक्यात रेती वाहतूक करणारे टिप्पर आणि ट्रॅक्टर दिवसेंदिवस बेफाम वेगाने धावत असून, त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अवैध गौण खनिज वाहतुकीच्या या साखळीला आळा बसत नसल्याचे चित्र आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी माऊली फाट्यावर अशाच अपघातात दोन बालके व त्यांच्या आजीचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत आहे. आज सकाळी मानेगावरून येणार्या टिप्परवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दादुलगाव बसस्थानक परिसरात झाडाखाली बसलेल्या काशिनाथ झाल्टे (वय ४० वर्ष ) आणि समाधान काळे (वय ५५ वर्ष ) या दोघांच्या अंगावर टिप्पर घुसला. या अपघातात ते दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खामगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, परवा दिवशीच देऊळगावराजा येथील दगडवाडी येथे तर भररस्त्यावर एकाला चिरडून डंपर पळून गेले होते. त्यात एक वृत्तपत्र विक्रेताच जागीच ठार झाला होता.
संतप्त नागरिकांनी पेटवून दिले टिप्पर!
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि अपघातग्रस्त टिप्पर पेटवून दिले. मागील घटनांनंतरही कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. भरधाव वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि बेकायदेशीर रेती वाहतूक रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.