– सरन्यायाधीशांनी सार्वजनिकरित्या फटकारल्यानंतर तीनही अधिकारी चैत्यभूमीवर पोहोचले; सरन्यायाधीशांकडे केली दिलगिरी व्यक्त!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेतील जातीयवादी मानसिकतेचा फटका आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनादेखील बसला. राज्याचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश राज्यात येत असताना प्रशासकीय यंत्रणेतील कुणीही त्यांच्या स्वागताला आले नाही. एवढेच नाही तर त्यांच्या बार काउन्सिलने आयोजित सत्कार सोहळ्यालाही राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त हे गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरन्यायाधीशांनी आपल्या समारोपाच्या भाषणात या अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर धावाधाव उडून हे तीनही अधिकारी सरन्यायाधीश हे दादर येथील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता, तेथे धावत पळत पाोहोचले व या तीनही वरिष्ठ अधिकार्यांनी सरन्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.
मुंबईत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांच्यावतीने देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभाच्या समारोपावेळी प्रोटोकॉलप्रमाणे प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी हजर न राहिल्याने सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘राज्याचा एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येत असताना, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना आणि मुंबई पोलिस आयुक्तांना येथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांचा त्यांनीच विचार करावा’, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फटकारले. ‘मला प्रोटोकॉलचे बिलकुल काहीही वाटत नाही, परंतु, राज्यघटनेच्या संस्थेचा प्रमुख पहिल्यांदा राज्यात येत असेल, आणि तोही राज्याचा असेल तर त्यांना जी वागणूक दिली, याचा त्यांनी विचार करावा, अशी नाराजीही सरन्यायाधीशांनी या वरिष्ठ अधिकार्यांवर व्यक्त केली. ‘आमच्यातील दुसरा कुणी असता तर आर्टिकल १४२चा विचार केला असता’, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. सरन्यायाधीशांनी अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमातून फटकारल्यानंतर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता शौनिक, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती हे तातडीने सरन्यायाधीश हे दादर येथे जाण्यापूर्वी तेथे पोहोचले. चैत्यभूमीमध्ये जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यापूर्वी या तिघांनीही सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.