– स्व. अर्जुनराव खंडारे द्वितीय पुण्यस्मरण; कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – स्व. अर्जुनराव खंडारे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त संजीवकुमार खंडारे यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासाठी ५१०१ रूपयांची सामाजिक मदत देत, समाजप्रबोधनाची परंपरा जपत श्रद्धांजलीचे रूपांतर विधायक कार्यासाठी समर्पनात केले.

शिक्षण, समाजसेवा आणि मानवीमूल्यांची कास धरणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व स्व. अर्जुनराव बाळाजी खंडारे सर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या स्मृतीला केवळ श्रद्धांजली न देता, एक संस्कारशील सामाजिक उपक्रमाचे स्वरूप देण्यात आले. या पुण्यस्मरणप्रसंगी संजीवकुमार खंडारे यांनी रुढी परंपरेला बाजूला ठेवत, सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरणासाठी ५१०१ रुपयांची आर्थिक मदत केली. या योगदानातून केवळ स्मृतीच नव्हे तर सामाजिक प्रेरणादेखील जपण्याचा मार्ग तयार झाला आहे. कार्यक्रमात गावातील सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी सदस्य तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. खंडारे सरांच्या सुविद्य पत्नी श्रीमती द्रौपदीबाई खंडारे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
या भावपूर्ण प्रसंगी गावातील नागरिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी स्व. अर्जुनराव खंडारे सरांच्या कार्याचे स्मरण करत, त्यांच्या मूल्यांची आठवण करून दिली. त्यांच्या कार्यातून आणि विचारातून आजही अनेकांना प्रेरणा मिळत आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. पुण्यस्मरणाला श्रद्धांजलीपेक्षा पुढे नेऊन एक सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम खरोखरच समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरतो आहे.