– ना प्राचार्य, ना शिक्षक तरीही महाविद्यालये चालतात कशी?; सन २०२५-२०२६ प्रथम वर्ष प्रवेशासासाठी ४९ महाविद्यालयांना बंदी!
– अमरावती विद्यापीठाने उगारला कारवाईचा बडगा; मेहकरचे सत्यजित, जरूडचे बच्चूभाऊ कडू, खामगावचे कॉलेज ऑफ मॅनेजमेंटलाही दणका!
बुलढाणा/अमरावती (बाळू वानखेडे) – ना प्राचार्य, ना, शिक्षक तरीही महाविद्यालये कशी चालतात, अशी रास्त शंका उपस्थित करत अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठांतर्गत अशा ४९ महाविद्यालयांना सन २०२५-२०२६ प्रथम वर्ष प्रवेशासासाठी बंदी घातली आहे. यामध्ये मेहकरचे सत्यजित कॉलेज, जरूडचे बच्चूभाऊ कडू कॉलेज तर खामगावच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचादेखील यात समावेश आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचा आदेश कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी निर्गमित केला आहे.

राज्यात सध्या विविध शाळांचे पीक आल्याचे दिसून येत आहे. काही शाळा, कॉलेजमध्ये तर सेल्फ फायनान्सच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा फी वसूल केल्या जाते. अशा महाविद्यालयांचा भार बहुतेक प्रभारी प्राचार्यांच्या खांद्यावर असतो. तर पुरेसा पगारसह इतर कारणाने शिक्षकही पूर्ण संख्येने नसतात, त्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याबाबत विद्यापीठाकडून वेळोवेळी सूचना देऊनही संबंधित संस्था चालकांकडून गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अमरावती विद्यापीठअंतर्गत अशा तब्बल ४९ महाविद्यालयांना सन २०२५-२०२६ प्रथम वर्ष प्रवेशासासाठी बंदी घालण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने २२ एप्रिलरोजी तसा ठरावदेखील पारित केला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील स्वर्गीय दादासाहेब हावरे कला महाविद्यालय पथ्रोट, महाराष्ट्र कला महाविद्यालय शिराळा तालुका चांदूरबाजार, स्वर्गीय आशालता व्ही गुर्जर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरजगाव कसबा तालुका चांदूरबाजार, श्रीमती राधाबाई किसनसिंग खुटपुळे विधी महाविद्यालय जरूड तालुका वरूड, बच्चूभाऊ कडू बीसीए महाविद्यालय जरूड तालुका वरुड, स्वर्गीय आर. जी. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तिवसा, दत्त विज्ञान महाविद्यालय तिवसा, स्वर्गीय पंचफुलाबाई गुणवंतराव भारसाकळे कला व वाणिज्य महाविद्यालय सातेगाव तालुका अंजनगाव सुर्जी, श्रीराम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोर्शी, राष्ट्रीय अल्पसंख्यांक महिला म.वि. मौजे गंभीरपूर अमरावती, वाहेद खान कॉलेज ऑफ सायन्स वलगाव रोड, डॉक्टर राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मार्डी रोड, मधुबन कला व वाणिज्य महाविद्यालय सावलीखेडा तालुका धारणी, द कॉलेज ऑफ एनिमेशन बायो इंजीनियरिंग अॅण्ड रिसर्च सेंटर अमरावती, सिपना स्कूल ऑफ प्लानिंग अॅण्ड आर्टिक्ट्रक्चरशिप ना. परिसर अमरावती, अकोला जिल्ह्यातील आर्यभट्ट इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर सायन्स केशवनगर, उत्तमराव डहाके शिक्षण महाविद्यालय कान्हेरी सरप तालुका बार्शीटाकळी, सौ. वैदेही विष्णू सराफ महाविद्यालय सिव्हिल लाईन अकोला, गुलाम जैनुल आबोदीन कला महाविद्यालय वाडेगाव तालुका बाळापूर, मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्स स्टडीज कौलखेड, श्री व्ही. के.जोशी महाविद्यालय गायगाव तालुका बाळापूर, बुलढाणा जिल्ह्यातील दादासाहेब रमेशसिंह राजपूत बीपीएड महाविद्यालय मलकापूर, ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय बुलढाणा, व्यवसाय प्रशासन महाविद्यालय जांभरुन रोड बुलढाणा, सत्यजित कॉलेज ऑफ सायन्स मेहकर, सावित्रीबाई फुले विज्ञान महाविद्यालय सिंदखेडराजा, कॉलेज ऑफ मॅनेजमेंट खामगाव, स्व. गजानन माणिकराव गावंडे विज्ञान महाविद्यालय खामगाव, स्वर्गीय गणेश भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय देऊळगाव मही, सरस्वती कॉलेज गौलखेडरोड शेगाव, महात्मा ज्योतिबा फुले विज्ञान महाविद्यालय संग्रामपूर, संत गजानन बाबा महाविद्यालय मोताळा, डॉक्टर झाकीर हुसेन हिंदी /उर्दू कला महाविद्यालय लोणार, श्री सावळे महाविद्यालय लाखनवाडा तालुका खामगाव, श्री सरस्वती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जानेफळ तालुका मेहकर, कै. कमलाबाई बनमेरू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय लोणार, कर्मवीर तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी खामगाव रोड चिखली, डॉक्टर आर्यन लाहोटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर सुलतानपूर तालुका लोणार, श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी सागवान रोड बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब नांदुरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय यवतमाळ, स्वर्गीय रुपेश कुमार इंगोले कॉलेज ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी यवतमाळ, सर्च कॉलेज ऑफ टेक्निकल एज्युकेशन यवतमाळ, अनिरुद्ध कॉलेज ऑफ सायन्स कळंब, ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान रात्रकालीन महाविद्यालय यवतमाळ, ईश्वर देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालय दिग्रस, श्रीमती सूर्यकांता तेलगोटे महिला महाविद्यालय धामणगाव रोड यवतमाळ तर वाशिम जिल्ह्यातील आदर्श अध्यापक महाविद्यालय कारंजा लाड, विज्ञान महाविद्यालय रिसोड व कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय जांभरुण परांडे या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. व्यवस्थापन परिषदेच्या या निर्णयामुळे सध्या तरी शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.