धुळे (ब्युरो चीफ) – येथील बसस्थानकातील बसमध्येच चालकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना, रात्रीच्या सुमारास घडली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी पोलीस आणि एसटी प्रशासन दाखल झाले होते. एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांचे अद्याप वेतन झालेले नाही. त्यामुळे हे कर्मचारी नैराश्यात असतानाच, ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, धुळे येथील बसस्थानकात हिरमण देवरे या बसचालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुणे – धुळे बसमध्ये घंटी वाजवायच्या दोरीच्या साह्याने त्यांनी गळफास लावत आत्महत्या केली. हिरामन देवरे हे पुण्याच्या शिवाजीनगर बसस्थानकात चालक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येची माहिती सर्वत्र पसरताच बसस्थानकात खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस आणि एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरु होती.
राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना, एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची भूमिका घेतली होती. या सरकारने त्यांचे आश्वासन पाळले तरी अशा दुर्देवी घटना रोखता येतील, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी घटनास्थळी व्यक्त करत होते.