– सोमठाणा येथील दिव्यांग तरूणाचा खूनच; वैभव वाघमारेच्या मृतदेहाचे गूढ उकलले!
– गावातील अजय सुरडकर याने घेतला दिव्यांग तरूणाचा हकनाक बळी?
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – तालुक्यातील सोमठाणा येथील वैभव पांडुरंग वाघमारे (वय २८) या दिव्यांग तरूणाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उलगडले आहे. या तरूणाच्या एका महिलेला पिण्यासाठी पाणी मागितले असता, तो दिव्यांग असल्याने व त्याला नीट बोलता येत नसल्याने त्याच्या हावभावाचा चुकीचा अर्थ घेऊन केवळ संशयावरून या तरूणाला गावातील अजय फत्तेसिंह सुरडकर याने उचलून विहिरीत फेकून दिले. त्याला धाकदपट करत विहिरीत फेकून दिल्याने वैभवचा बुडून मृत्यू झाला होता. या हत्याकांडाचा चिखली पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्याआत उलगडा करून आरोपी निष्पन्न केला आहे. दरम्यान, आराेपी पसार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
चिखली पोलिस ठाणेअंतर्गत येणार्या सोमठाणा येथे वैभव पांडुरंग वाघमारे या दिव्यांग तरूणाचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. तत्पूर्वी, तो सकाळपासून बेपत्ता होता. याप्रकरणी चिखली पोलिसांत मिसिंग दाखल झाली होती. चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार राजेश सुसर व पोलिसांनी पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला असता, धक्कादायक प्रकार समोर आला. गावातील चर्चेनुसार, वैभव वाघमारे या दिव्यांग तरूणाने शेजारील अजय फत्तेसिंह सुरडकर यांच्या कुटुंबीयांकडे पिण्यासाठी पाणी मागितले होते. परंतु, वैभव हा दिव्यांग असल्याने त्याला सुस्पष्ट उच्चार करता येत नव्हते. त्यामुळे त्याच्या हावभाव व शब्दांचा चुकीचा व अश्लील अर्थ लावून अजय सुरडकर (रा. सोमठाणा) याने वैभवला दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास धाकदपट करून त्याच्या पाठीमागे जावून त्याला उचलून गावातीलच लिंबाजी काशीनाथ झगरे यांच्या विहिरीत फेकून दिले. दिव्यांग असल्याने व पोहता येत नसल्याने वैभव वाघमारे याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेबाबत वैभव याचा भाऊ प्रसाद पांडुरंग वाघमारे (वय २६) याने वरील आशयाची फिर्याद चिखली पोलिसांत दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी अजय फत्तेसिंह सुरडकर (वय ४२) याच्या विरोधात कलम १०३ (१) बीएनएसनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान हे करत आहेत.
