– प्रतिष्ठेच्या देऊळगाव साखरशा, डोणगाव, मादणी व जानेफळचे सरपंचपद महिलांसाठी राखीव!
– सरपंचाची निवड थेट जनतेतून, गावागावात मिटिंगांना जोर येणार; प्रतिष्ठा पणाला लागणार!
– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मादणीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात ८७० ग्रामपंचायती असून, यातील अर्धी सरपंचपदे महिलांसाठी राखीव असून, यासाठीचे सरपंचपदाचे आरक्षण आज, दि. २५ एप्रिल रोजी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. यामध्ये मेहकर तालुक्यातील ९८ पैकी ४९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव निघाले आहे. यामध्ये प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या देऊळगाव साकरशा, डोणगाव व जानेफळ ग्रामपंचायतीचे सरपंचपदही महिलेसाठी राखीव निघाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण निश्चित झाल्याने व सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने आता गावागावात पॅनल तयार करण्यासाठी बैठकांना जोर येणार आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मादणी गावाचे सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव निघाले आहे.
जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या पुढील पाच वर्षांसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण दि.१६ एप्रिलरोजी संबंधित तालुक्याचे ठिकाणी काढण्यात आले होते. मेहकर तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षणही तहसीलदार नीलेश मडके यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महसूल सहाय्यक पी. एम. शेळके, महसूल सहाय्यक प्रवीण परमाळे व विविध पक्ष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत मेहकर येथील तहसील कार्यालयात काढण्यात आले होते. यापैकी अर्धी पदे महिलांसाठी राखीव ठेवायची असल्याने यासाठीचे आरक्षण आज, दि.२५ एप्रिलरोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, उपजिल्हाधिकारी निवडणूक व संबंधित तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. यामध्ये मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतीपैकी ४९ ग्रामपंचायतचे सरपंचपद महिलेसाठी आरक्षित निघाले आहे. यामध्ये अनुसूचित जाती महिलेसाठी बार्हई, चायगाव सोनाटी, बरटाळा, आंध्रुड, वरदळा, गजरखेड, सावंगी वीर, कळप विहीर, घाटनांद्रा व सोनारगव्हाण राखीव निघाले आहेत. अनुसूचित जमाती महीलेसाठी मादणी, शहापूर व कासारखेडचे सरपंचपद राखीव निघाले आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी शिवाजीनगर, कनका बुद्रुक, थार बदनापूर, विवेकानंद नगर, हिवरा खुर्द, चिंचोली बोरे, नायगाव दत्तापूर, मोहना खुर्द, पिंपळगाव ऊंडा, अकोला ठाकरे आरक्षित निघाले आहे. सर्वसाधारण महिलेसाठी उकळी, कंबरखेड घुटी, द्रुर्गबोरी, पिंप्री माळी पारखेड, बदनापूर, बाभुळखेड, भालेगाव, मिस्किन वाडी, साबरा, हिवरा साबळे, वागदेव, जानेफळ, अंजनी बुद्रुक, बोरी, डोणगाव, देऊळगाव साखरशा, दादुलगव्हाण, गोहोगाव, गणपूर, शेलगाव काकडे, शेलगाव देशमुख, विश्वी आदी ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव निघाले आहे. याबाबतची माहिती तहसीलदार नीलेश मडके यांनी दिली.
सरपंचपदाचे आरक्षण आता निश्चित झाल्याने व सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सहाजिकच सरपंचपदासाठी उभे असलेल्या उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेसोबतच अटीतटीचीदेखील होणार असून, पॅनल बसवण्यासाठी गावागावात बैठकांनाही चांगलाच जोर येणार आहे.