– चिखलीतील खामगाव चौफुलीवरील रात्रीची घटना
– मोकळ्या जागेत लावलेल्या जुन्या फर्निचर दुकानदाराच्या खिशावर दुचाकीस्वार चोरट्यांचा डल्ला!
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – चिखली शहरातील बुलढाणा रोडवर खामगाव चौफुलीजवळील व्यंकटेश टाईल्स समोरील मोकळ्या जागेत ३ ते ४ वर्षापासून खामगाव येथील शे. सलीम शे. हनीफ (वय २८) हा जुन्या फर्निचरचे दुकान चालवत आहे. आज (दि.२५) सकाळी १२ वाजून २० मिनिटांनी शे. सलीम आणि दुसरे साथीदार पंडित गोलांडे हे झोपलेले असता, अचानक सलीमच्या खिशातून कोणीतरी पैसे काढतांना समजले. त्यामुळे त्यांनी डोळे उघडून बघितले असता, एक काळया रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातलेला चोरटा दिसला. त्यावर दुकानदार सलीम आणि पंडित गोलांडे यांनी त्याचा प्रतिकार केला असता, त्या चोरट्याने सलीमच्या खिशातील २५ हजार रुपये काढून घेऊन, व सलीम याला जोरात झटका देऊन चोरटा आणि त्याचा साथीदाराने मोटारसायकलने अंधाराचा फायदा घेऊन पोबारा केला.
सदर या घटनेबाबत चिखली पोलिस स्टेशनला दुकानदार शे. सलीम शे. हनीफ याने तोंडी तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोराविरुद्ध अद्याप तरी गुन्हा दाखल झाला नाही. या घटनेने उघड्यावर दुकान थाटून व्यावसाय करणारे व उघड्यावरच राहणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शे. सलीम आणि पंडित गोलांडे हे मोठ्या कष्टाने पैसे कमावित असताना चोरट्याने त्यांच्या खिशावर झोपेतच डल्ला मारल्याने त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कुणी तरी पाळत ठेवून हे कृत्य केले असल्याचा पोलिसांना संशय आहे. अधिक तपास चिखली पोलिस करत आहेत.