– सोमठाणा येथील धक्कादायक घटना; आत्महत्या की घातपात?
– काल सकाळपासून होता बेपत्ता, सर्वत्र केली शोधाशोध; आज मृतदेहच सापडल्याने खळबळ!
चिखली/बुलढाणा (राजेश लोखंडे) – काल सकाळपासून बेपत्ता असलेल्या विकलांग तरूणाचा मृतदेह विहिरीत सापडल्याने तालुक्यातील सोमठाणा येथे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्या, की घातपात आहे? याबाबत गावात शंकाकुशंका व्यक्त केली जात आहे. वैभव पांडुरंग वाघमारे (वय २८) असे या तरूणाचे नाव असून, तो विकलांग आहे. चिखली पोलिस पुढील तपास करत होते.
सविस्तर असे, की चिखली पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोमठाणा येथे काल (दि.२३) फिर्यादी पांडुरंग त्र्यंबक वाघमारे यांनी त्यांचा विकलांग मुलगा वैभव पांडुरंग वाघमारे (वय २८) हा बेपत्ता झाल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. कालपासून या तरूणाचा गावकरी व नातेवाईक सगळीकडे शोध घेत होते. परंतु, आज (दि.२४) सकाळी वैभवचे प्रेतच गावातील लिंबाजी झगरे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने सोमठाणासह परिसरात खळबळ उडाली. हा प्रकार आत्महत्या आहे की कुणी खून करून मृतदेह विहिरीत फेकला, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केली जात होती. वैभव याच्या बाबतीत नेमके काय घडले? असा प्रश्न उपस्थित होत होता.
शरीराच्या एका बाजूने विकलांग असलेला वैभव अचानक असा कसा गावातून गायब झाला? आणि त्याचा शोध घेऊन, नातेवाईकांकडे चौकशी करूनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. शेवटी त्याची मिसिंग चिखली पोलिसांना देण्यात आली. त्या तक्रारीवरून चिखली पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यू क्रमांक ३२/२५ कलम १९४ बीएनएसप्रमाणे दाखल करण्यात आला आहे. आज विहिरीत वैभव याचा मृतदेह आढळून आला, ही माहिती चिखली पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचासमक्ष पंचनामा करून सदरचे प्रेत विहिरीबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे पाठविले होते. उत्तरीय तपासणीनंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. अद्याप वैभव याच्या मृत्यूचे कारण कळले नसून, या घटनेचा योग्य तपास चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार राजेश सुसर हे करीत आहेत.