– मेहकरनजीकची समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना; तिघांची प्रकृती चिंताजनक, संभाजीनगरला हलविले!
मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – समृद्धी महामार्गावरून भरधाव जात असताना चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कार समोरून चालणार्या ट्रकला पाठीमागून धडकली. आज (दि.११) पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेहकरजवळ हा भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मेहकर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले, की अपघातग्रस्त कार पुण्याकडून वाशिमकडे जात होती. त्यावेळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेहकरजवळ नागपूर कॉरिडॉरवर चेनेज २६८ येथे हा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव असलेली कार अनियंत्रित होऊन समोरच्या ट्रकला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील दोघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. या धडकेनंतर कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. अपघाताची माहिती मिळताच क्यूआरटी (क्विक रिस्पॉन्स टीम) व स्थानिक पोलिस, बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातामधील जखमींना उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, जखमी झालेल्या तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख हे वृत्तलिहिपर्यंत पटलेली नव्हती. मेहकर पोलिसांनी कार आणि ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यापूर्वीही या मार्गावर अनेक घटना घडल्या आहेत.