– शेतीसाठी आठ तास वीज; पैकी चार तास गायब; विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाणही वाढले!
– ‘आमच्याकडे फक्त वीज सप्लाय, चौकशी जानेफळला करा; सस्तीच्या कनिष्ठ अभियंत्याचे जखमेवर ‘मीठ’ चोळणारे उत्तर!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – चैत्राच्या महिन्यात सूर्य आग ओकत आहे. त्यातच शेतीसाठी आठ तास अखंडित वीज पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी, देऊळगाव साखरशा परिसरात कधी कधी चार, चार तास वीज गायब असते. त्यामुळे परिसरातील हजाराचे वर एकरावरील भुईमूगाचे पीक धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उन्हाचा चढता पारा, त्यातच विजेच्या लपंडावामुळे गावकरीही घामाघून होत असून, जीवाची लाहीलाही होत आहे. तर यामुळे विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याबाबत सस्तीचे कनिष्ठ अभियंता निकुंभे यांना विचारले असता, आम्ही फक्त वीज सप्लाय करतो, लाईन का गेली, याबाबतची चौकशी आपण जानेफळ वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे करा, असे जखमेवर मीठ चोळणारे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळेदेखील संताप व्यक्त केला जात आहे. तर शेतीसाठी आठ तास अखंड वीज देण्याचे वचन दिलेल्या शासनाने आता याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, नेहमीच्या लपंडावामुळे संबंधित कर्मचारीदेखील वैतागले आहेत.
यावर्षी पाऊस जास्त झाल्याने खरिपाची पिके हातची गेली. विविध रोगांनी आक्रमण केल्याने मुख्य पीक सोयाबीनला एकरी दोन पोत्याची झडती लागली, तर तर कपाशीची अवस्थाही तीच झाली. त्यातच मातीमोल भाव असल्याने व पीक कमी झाल्याने खर्चही वसूल झाला नाही. दुसरीकडे, पाऊस जास्त झाल्याने धरणे व विहिरी तुडुंब भरल्या. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील उतावळी प्रकल्पही तुडुंब भरला होता. त्यामुळे शेतकर्यांनी गहू, हरभरासह इतर रब्बीची पिके तसेच उन्हाळी भुईमुगाची पेरणीही मोठ्या प्रमाणात केली. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशासह पारखेड, नायगाव देशमुखसह परिसरात जवळजवळ हजार ते बाराशे एकरच्यावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी केलेली आहे. खरिपाने धोका दिल्याने आता सर्व मदार ही भुईमूग पिकावरच आहे. परंतु परिसरातील शेतकर्यांना विजेच्या लपंडावाशी दोन हात करण्याची पाळी आली आहे. शासनाने शेतीसाठी आठ तास अखंड देण्याची हमी दिली असली तरी, या परिसरात कधी कधी चार चार तास वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे ऐन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेले भुईमूग पीक धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे. सततच्या वीज खंडित होण्यामुळे व पूर्ण क्षमतेची वीज मिळत नसल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. बहुतांश शेतकर्यांनी कर्ज काढून भुईमूग पेरणी केली आहे. कधी कधी तर रात्रभर लाईन गायब असते, त्यामुळे लाईनची वाट पाहत शेतकर्यांना रात्र जागून काढावी लागते आहे. विजेच्या जाण्या-येण्याने कर्मचारीदेखील वैतागले आहेत.
आज, दि. १० एप्रिल रोजीही चार ते पाच तासाच्यावर वीज गायब होती तर वायरमन विनोद राठोड, नीलेश राठोडसह इतर भरऊन्हात फॉल्ट पाहण्यासाठी चान्नी ते देऊळगाव साखरशादरम्यान पेट्रोलिंग करत होते. याबाबत सस्ती, जि. अकोला येथील कनिष्ठ अभियंता निकुंभे यांना विचारले असता, आम्ही फक्त वीज सप्लाय करतो, लाईनच्या परिस्थितीबाबत आपण जानेफळ ता. मेहकर वीज वितरण कार्यालयाशी संपर्क करावा, असे जखमेवर मीठ चोळणारे उत्तर दिल्यानेदेखील संताप व्यक्त केला जात आहे. तर जानेफळचे कनिष्ठ अभियंता बेंदेवार यांना याबाबत विचारले असता, ट्री कटिंगमुळे हा प्रॉब्लेम येत असावा, परंतु वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत जातीने लक्ष घालतो, असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. विजेच्या या लपंडावामुळे मात्र कर्मचारीrही वैतागले असून, यामुळे त्यांना जनतेच्या संतापालादेखील सामोरे जावे लागते आहे. भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्याने या महिन्यात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.