बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) : शेत रस्त्यावर अतिक्रमण केले किंवा नाही? याबाबत स्थळ निरीक्षण अहवाल तात्काळ सादर करण्यासाठी शेतकऱ्यांना 4 हजाराची लाच मागणारा लाचखोर तलाठी रंगेहाथ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सदर कारवाई बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 5 ऑगस्ट रोजी लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील हॉटेल भोलेनाथ भोजनालय अँड वाईन बार येथे करण्यात आली.
लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथील काही शेतकऱ्यांनी सुलतानपूर शिवारातील ई – क्लास शेत जमिनी वाहितीसाठी भाडे पट्टयावर घेतली आहे . या शेतीकडे जाणाऱ्या शेत रस्त्यावर सुलतानपूर येथील एका महिलेने अतिक्रमण केले आहे. याबाबत तक्रारदार शेतकऱ्यासह इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी लोणार तहसीलचे तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीवरून तहसीलदारांनी चौकशी सुरू केली आणि तक्रारदार शेतकरी व इतर शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यावर सदर महिलेने अतिक्रमण केले किंवा नाही? याबाबत तलाठी, ग्रामसेवक व मंडळ अधिकाऱ्यांना चौकशी करून स्थळ निरीक्षण अहवाल सादर करण्याचे सांगितले. मात्र यावेळी सदर अतिक्रमण बाबतचा अहवाल लवकर सादर करण्यासाठी सुलतानपूरचे तलाठी प्रमोद हरीभाऊ दांदडे,वय 51 वर्षे, व्यवसाय नोकरी पद- तलाठी वर्ग-3, सुलतानपुर ता. लोणार जि.बुलडाणा. रा. शिवाजी चौक, उंद्री ता. चिखली जि. बुलढाणा यांनी तक्रारदार शेतकरी व इतर शेतकऱ्यांना 4 हजाराची लाच मागितली. त्यामुळे शेतकऱ्यांनी 4 हजाराची लाच देण्याचे कबूल करून याबाबत शेतकऱ्यांनी बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवर बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी कारवाई केली. या पडताळणी कारवाईत तलाठी प्रमोद दांदडे यांनी शेत रस्त्यावर अतिक्रमण केले किंवा नाही ? असा शेत रस्त्याचा स्थळ निरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी 4 हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले . यावरून 5 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि सुलतानपूर येथील सुलतानपूर येथील हॉटेल भोलेनाथ भोजनालय अँड वाईन बारवर तक्रारदार शेतकऱ्याकडून 4 हजाराची लाच घेतांना तलाठी प्रमोद दांदडे यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लोणार पोलीस स्टेशनला लाचखोर तलाठी दांदडे विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, देविदास घेवारे, अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती, संजय चौधरी, पोलिस उपअधीक्षक, ला.प्र.वि. बुलडाणा, सचिन इंगळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. बुलडाणा, पो.हे.काॅ. राजु क्षीरसागर, पो.ना. प्रवीण बैरागी, , जगदीश पवार, पो.काॅ. अझरुद्दीन काझी, चालक पो.काॅ. अरशद शेख यांनी केली.
सर्व नागरीकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ दुरध्वनी क्रं – 07262- 242548, टोल फ्रि क्रं 1064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, बुलडाणा यांनी केले आहे.