– ठेकेदार व महावितरण कर्मचार्यांची हलगर्जी जीवावर बेतता बेतता राहिली!
– अंत्री कोळी गावातील थरारक घटना; ठेकेदार, महावितरणबद्दल तीव्र संताप
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील अंत्री कोळी येथे सर्व वीज खांबांवरील वीज तारा काढून टाकण्यात आल्या आहेत. परंतु, ठेकेदार व महावितरणच्या कर्मचार्यांनी काही तारा तशाच ठेवल्यात. आज यापैकी एक जीवंत तार शेवग्याच्या झाडाची फांदी तुटली म्हणून कोसळली. खाली लहान मुले, जनावरे होती. केवळ नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना घडली नाही. तथापि, सरस्वती हिवाळे यांचा पायाला जखम झाली आहे. या घटनेने ठेकेदार व महावितरण कर्मचारी यांच्या हलगर्जीबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथे सर्व गावातील विद्युत खांबांवरील वीजतारा काढून टाकण्यात आलेल्या आहेत. ठेकेदार आणि महावितरण कर्मचारी तसेच अभियंता यांच्या संगनमताने गावातील राहिलेल्या काही खांबावरील तारा मात्र अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. याबाबत महेंद्र तुकाराम हिवाळे यांनी महावितरणला वेळोवेळी फोनद्वारे तसेच लेखीपत्राद्वारे सूचना केली होती, की माझ्या घरासमोरील गेलेल्या तारा या काढून टाका. त्या धोकादायक आहेत. तरीही महावितरण यांनी दुर्लक्ष केले व गावातील ज्यावेळेस केबल टाकने चालू होते, त्यावेळेसही ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या. परंतु सदर ठेकेदाराने केबल त्यांच्या पूलपर्यंत आणून सोडले आणि राहिलेल्या तारा फक्त गुंडाळून ठेवल्या होत्या. आज, दि. २९ मार्चरोजी महेंद्र हिवाळे यांच्या घरासमोरील शेवग्याच्या छोटीशी फांदी पडली असता, मेनलाईन तुटली. तारेखाली जागेमध्ये लहान मुले खेळत होती व त्यांच्या गाड्या व जनावरे असतात. परंतु, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु सरस्वती तुकाराम हिवाळे यांच्या पायाला छोटीशी इजा झाली आहे. महावितरण व ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे मोठा अपघात झाला होता. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात निभावले. याबद्दल गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.