– पालकमंत्र्यांकडून विदर्भ पाटबंधारे विभागाला तातडीने प्रस्ताव सादर करण्याची शिफारस
– आ. मनोज कायंदे यांनी पाणीप्रश्नी घेतली पालकमंत्र्यांची भेट!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातील धोत्रा नंदईसह १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मिळण्याचा मार्ग अखेर आमदार मनोज कायंदे यांच्या प्रयत्नाने मोकळा झाला असून, तशा प्रकारचे पत्र पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी विदर्भ पाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांना देऊन विदर्भ पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रातून वगळण्याची शिफारस झालेले उपलब्ध पाणी मौजे धोत्रानंदई व इतर १४ गावांना देणेसाठी प्रस्ताव तयार करून मंजुरी द्यावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच हे पाणी या गावांना मिळण्याची शक्यता असून, वैâलास नागरे यांनी पाण्यासाठी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही आ. मनोज कायंदे यांनी दिली होती. ती ते सत्यात उतरवित असल्याचे दिसून येत आहे.
खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत देऊळगावराजा तालुक्यातील धोत्रा नंदईसह १४ गावांना खडकपूर्णाचे पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी आ. मनोज कायंदे यांनी पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन केली आहे. या भेटीत पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील पाण्याचा गंभीर झालेला प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतला. त्यानंतर तातडीने विदर्भ पाटबंधारे विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांना शिफारस पत्र सादर केले. मौजे धोत्रानंदई व इतर १४ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी तातडीने मिळावे, यासाठी २००८ सालापासून वेळोवेळी आंदोलने, मोर्चे, उपोषण आदी मार्गांनी तेथील शेतकरी मागणी करत आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या विविध लघुकालव्यांवरील एकुण १६७३ हेक्टर सिंचनक्षेत्र लाभधारकांच्या विरोधामुळे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाचे ठराव क्र. ७० व ७४ अन्वये लाभक्षेत्रातून वगळण्याची शिफारस केलेली आहे. तेव्हा, सदरचे वगळण्यात येणार्या क्षेत्रामधील उपलब्ध पाणी, मौजे धोत्रानंदई व इतर १४ गावांना देणेसाठी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये समावेश करणे व सुधारित प्रस्ताव तयार करणेबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना द्याव्यात, अशी शिफारस पालकमंत्री पाटील यांनी गिरीश महाजन यांनी केली आहे. दरम्यान, या पत्रानंतर पाटबंधारे विभागाकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, हे पाणी लवकरच या १४ गावांत पोहोचेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.