– अखिल भारतीय छावा संघटनेने घेतली नागरे कुटुंबीयांची भेट
– कै. नागरे यांच्या पत्नीला शासकीय नोकरी, मुलांच्या खात्यात ५० लाख टाका!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – देऊळगांवराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ या गावातील स्व. कैलास नागरे ‘आदर्श युवा शेतकरी’ पुरस्कारप्राप्त शेतकरी यांनी शेतीच्या पाण्यासाठी आत्महत्या केली. या तरूण शेतकर्याने शेतकर्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली, अनेक लढे उभारले परंतु पाहिजे त्या प्रमाणात यश आले नाही. प्रशासनाच्या वेळकाढूपणाने, उदासीनतेमुळे पदरी निराशा आली व शेवटी त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या परिवाराला आधाराची गरज आहे. या गोष्टीचे राजकारण करू नका, त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी पोकळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना करायला हव्यात. त्यांनी आतापर्यंत ठोस मदत करायला पाहिजेत परंतु विलंब का होत आहे, आता वेळकाढूपणा नको, या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणार आहोत, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी नागरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव म्हणाले, की नागरे परिवाराच्या मागण्या योग्य असून, स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे, त्यांच्या मुलांचे सरकारने पालकत्व स्वीकारावे, तसेच प्रत्येक मुलांच्या खात्यात ५० लाख रुपये टाकण्यात यावे, या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात. अखिल भारतीय छावा संघटना नागरे परिवाराच्या मागण्या शासन दरबारी आक्रमक पद्धतीने मांडणार असून, न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी असणार आहे. नागरे परिवाराला आधार देण्यासाठी बुलढाणा छावा संघटना त्यांची प्रत्यक्ष परिस्थिती जाणण्यासाठी शिवनी आरामाळ येथे भेट देऊन कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत लढा लढणार असल्याबाबत नागरे परिवाराला त्यांनी शब्द दिला.
यावेळी अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोकराजे जाधव, अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव टेक, अखिल भारतीय छावा कार्याध्यक्ष, कृष्णा कोल्हे, सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, अखिल भारतीय छावा प्रसिद्धीप्रमुख रफीक सैय्यद (पाटील), गजानन पुरंदरे यांच्यासह आदी पदाधिकारी नागरे परिवाराच्या दुःखात सहभागी होऊन, सर्वांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.