– पहिला मुक्काम राणेगावमध्ये, दुसरा प्रभूवाडगावमध्ये तर तिसर्या मुक्कामी दिंडी पैठणमध्ये पोहोचणार!
– गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रींच्या अध्यक्षतेत दिंडी करणार प्रस्थान
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक साधुसंतांच्या दिंड्या पैठणला जातात. श्री क्षेत्र भगवानगड संस्थानचीसुद्धा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी नाथांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दिंडी पैठणला जाणार आहे. या सोहळ्याला ‘नाथषष्ठी’ असे म्हणतात. या सोहळ्यासाठी भगवानगडाचे सर्व भक्त गडावर येऊन सोमवार, दि.१७ मार्चरोजी दुपारी ठीक १ वाजता ह.भ.प.श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अध्यक्षतेखाली दिंडीसोबत पैठणकडे प्रस्थान करणार आहेत.
या दिंडी सोहळ्याचा पहिला मुक्काम राणेगावमध्ये, दुसरा मुक्काम प्रभूवाडगावमध्ये असून, तिसर्या मुक्कामी दिंडी पैठणमध्ये पोहोचते. दिंडी सोहळ्यादरम्यान भगवानगडावरील युवा कीर्तनकार, सर्व साधकवर्ग व गडाचा संपूर्ण भक्तवर्ग मोठ्या आनंदामध्ये ‘भानुदास एकनाथ’ नामाचा गजर करत मार्गक्रमण करतो. वारीमध्ये चालताना पहाटे काकडा भजन, आंधळा, पांगळा, वासुदेव, गौळणी इत्यादी होतात. त्यानंतर दुपारचे अभंग गायले जातात. यामध्ये समाधीचे अभंग, पत्रिकेचे अभंग इत्यादींचा समावेश असतो. सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ व शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा हरिपाठ होतो. हरिपाठानंतर सर्व वारकर्यांना नियोजित ग्रामस्थांतर्पेâ जेवणाची पंगत दिली जाते. रात्री ८ ते १० या वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम असतो. कीर्तनानंतर जागर केला जातो. दिंडी पैठणमध्ये पोहोचल्यानंतर नाथवंशज दरवर्षी भगवानगडाच्या फडामध्ये येऊन भगवानगडाच्या दिंडीला नाथषष्ठी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतात. श्री क्षेत्र भगवानगडाच्या फडामध्ये नाथांच्या समाधी सोहळ्याचा काला होईपर्यंत दररोज पहाटे काकडा भजन, दुपारचे भजन, दोन्ही हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर इत्यादी सर्व धार्मिक नीत्यनियम पार पाडले जातात.