– डीपी रोड व्यापारी व्यावसायिकांचा बंदला पाठिंबा!
चिखली (महेंद्र हिवाळे) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोषबापू देशमुख यांची अतिशय नृशंस हत्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली असून, यातील आरोपीसोबत मास्टरमाईंड असलेल्यांना प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी करीत, चिखली येथील सकल मराठा समाज व सर्व समाज बांधवांनी उद्या, मंगळवारी (दि.११) चिखली शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला डीपी रोड व्यापारी असोसिएशनने पत्राव्दारे आपला पाठिंबा जाहीर केला आहे. डीपी रोडवरील सर्व प्रतिष्ठाणे बंद ठेवणार असल्याचे व्यवसायिकांनी जाहीर केले आहे.
कै. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, त्यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यावर कोणताही संवेदनशील व्यक्ती व्यथीत झाल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत डी.पी. रोड व्यापारी असोसिएशनने स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना प्रकट करीत, या बंदला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. डी. पी. रोड व्यापारी असोसिएशन, सकल मराठा समाज बांधवांसह सर्व समाज बांधवांच्या या आयोजित बंदला आपला पाठिंबा व्यक्त करीत असून, या दिवशी डी. पी. रोडवरील सर्व प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यात येतील. असे डी.पी. रोड असोसिएशनचे अध्यक्ष राकेश चोपडा, उपाध्यक्ष शामसुंदर खरपास यासह अदिंनी पत्राव्दारे कळविले आहे.