– गोपनीय पथकाने तांत्रिक तपासाच्या सहाय्याने अंत्री खेडेकर येथील दोन आरोपींना केली अटक!
चिखली (प्रताप मोरे) – महावितरण विभागाचे ३२ विद्युत लोखंडी पोल चोरट्यानी वाहनाद्वारे चोरून नेले होते. या घटनेची तक्रार कनिष्ठ अभियंता यांनी पोलिस स्टेशन अंढेरा येथे दिली होती. तक्रार दाखल होताच, अवघ्या १२ तासाच्याआतच चोरटे ताब्यात घेवून ३२ विद्युत पोल हस्तगत करण्यात आले असून, अंत्री खेडेकर येथील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. अंढेरा ठाणेदार रूपेश शक्करगे यांच्या कुशल नेतृत्वात गोपनीय पथकाने ही कामगिरी फत्ते केली. विद्युत खांब चोरीची ही घटना अंढेरा वीज वितरण विभागात काल, दि.९ मार्चरोजी घडली होती.
अंढेरा पोलीस स्टेशनला नुकतेच रुजू झालेले एलसीबी विभागाचे सिंघम ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी पदभार हाती घेतल्यापासून आपली गुपित सूत्रे हाती घेवून तपासाला सुरवात केली आहे. त्यामध्ये संपूर्ण बीट जमदार आणि पोलिस कर्मचारी यांना कडक भाषेत सांगितले की, पोलीस स्टेशनमध्ये कामावर असतांना गणवेशात असणे बंधनकारक असून, आलेली तक्रार कोणतीही असो पण त्या तक्रारीची कसून चौकशी करणे, जर कोणताही कर्मचारी कामात गैरवर्तन करत असेल तर त्याला माफ करणार नाही, अशा सूचना असल्याने पोलीस स्टेशनमध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. त्यातच, काल (दि.९) अंढेरा वीजवितरण विभागाचे अभियंता यांनी तक्रार दिली की, वीज वितरण विभागाचे ३२ लोखंडी विद्युत खांब (अशोका बिल्डकॉन लि.नाशिक) कंपनीचे चोरीला गेले आहे. अशा तक्रारीवरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगावराजा श्रीमती मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांचे गोपनीय पथक तयार केले. त्यामध्ये ठाणेदार रुपेश शक्करगे, पीएसआय सुरेश जारवाल, पोहेकॉ सिध्दार्थ सोनकांबळे, पो.ना. भरत पोफळे यांना सोबत घेवून गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न करून त्याना ताब्यात घेतले, आणि त्यांच्याकडून ३ लाख, ८४ हजार रुपये किंमतीचे ३२ लोखंडी पोल हे १०० टक्के हस्तगत केले. अशा घटनेमुळे चोरट्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अभियंता यांच्या तक्रारी वरून ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार यांनी अंत्री खेडेकर येथील दोन आरोपीविरुद्ध अप न. ७१/२५ कलम ३०३ (२) बीएनएसप्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.