– हजारो लेकीबाळींनी उचलला शुकदास माऊलींच्या कलशारोहणाचा हक्काचा अर्थभार, अजूनही आर्थिक मदतीचा ओघ सुरूच!
– राज्यभरातून शुकदास माऊलींच्या हजारो लेकी मंदिर निर्माण व कलशारोहणासाठी आल्या धावून !
हिवरा आश्रम/मेहकर (समाधान म्हस्के पाटील) – केवळ शिक्षणाची सोय नाही म्हणून गावखेड्यातील हजारो मुलींचे शिक्षण सुटत होते. परंतु, निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी हिवरा आश्रमसारख्या उजाड माळरानावर १९८० मध्ये विवेकानंद शैक्षणिक संकुलाची निर्मिती करून, शेतकरी, गोरगरिबांच्या मुलींना शिक्षणाची सोय केली. परिणामी, गेल्या साडेचार दशकांत या शैक्षणिक संकुलातून शिकून लाखो लेकीबाळी बाहेर पडल्या. स्वतःच्या पायांवर उभ्या राहिल्या; शासकीय व खासगी नोकरी प्राप्त करून आर्थिक स्वयंपूर्ण बनल्या. त्यांचा आदर्श समाजासमोर निर्माण झाला. ज्या शुकदास माऊलींनी त्यांच्या जीवनात क्रांतीकारी बदल घडविला, त्या माऊलींचे हे ऋण फेडण्यासाठी त्यांना खरे तर हक्काची अशी संधी मिळतच नव्हती. परंतु, विवेकानंद आश्रमात शुकदास माऊलींचे भव्यदिव्य समाधी मंदिर निर्माण झाल्यानंतर या मंदिराच्या कलशारोहणात लेकीबाळींचा धार्मिक हक्क हा अबाधित असतो. त्यानिमित्ताने शुकदास माऊलींच्या हजारो लेकीबाळींनी ‘फुल ना फुलाची पाकळी’ या कलशारोहणासाठी पाठवून आपला खारीचा वाटा उचलला आहे. येत्या रामनवमीला (दि.६ एप्रिल) पू. शुकदास महाराजश्रींच्या संजीवन समाधी मंदिराचे वेदोक्त व विधीवत कलशारोहण होणार असून, त्यासाठी देश व राज्यभरातून लाखो भाविक या सोहळ्यासाठी विवेकानंद नगरीत येण्याची शक्यता आहे.
निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी हिवरा बुद्रूकच्या उजाड माळरानावर विवेकानंद आश्रमाची स्थापना करून या उजाड माळरानाचे विवेकानंद नगरीच्या रूपात सुंदर असे नंदनवन बनवले. हिवरा आश्रम या नावाने नावारूपाला आलेले हे गाव टुमदार अशा शहरात वेगाने परावर्तीत होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखले जाणारे येथील विवेकानंद शैक्षणिक संकुल हे महाराष्ट्रातील ‘केंम्ब्रिज’ मानले जाते. असे विवेकानंद आश्रमाचे संस्थापक, कर्मयोगी संत व असंख्य जीवांना मुक्तीची पहाट दाखवणारे पू. शुकदास महाराज यांनी रामनवमीच्या पर्वावर व ब्रम्हमुहूर्तावर ब्रम्हलीन अवस्था प्राप्त करत महानिर्वाण केले होते. त्यांचे संजीवन समाधी मंदिर विवेकानंद आश्रमात पूर्ण झाले असून, त्याचा कलशारोहण सोहळा रामनवमीदिनी, दि. ६ एप्रिल २०२५ रोजी वेदोक्त पद्धतीने व विधीवत होत आहे.
भूगर्भातील समाधी संजीवन असली तरी, मंदिरात शुकदास महाराजश्रींची मूर्तीही बसवली जाणार असून, त्यात प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा यानिमित्त होणार असून, त्यासाठी वेदसंपन्न ब्रम्हवृंद विधी करणार असून, तब्बल २१ भिन्न जातीचे जोडपे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊन त्यांच्याहस्ते सर्व धार्मिक विधी संपन्न होणार आहे. तर या विधीचे आचार्यपद परमपूज्य परिव्राजक श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज हे भूषविणार आहेत.
आपल्या हिंदूधर्मात मंदिराचा कलशारोहणाचा मान हा गावातील लेकीबाळींचा असतो. शुकदास माऊली हे तर राज्य आणि देशभरातील लेकीबाळींची मायमाऊली होते. त्यामुळे या कलशारोहणाची जबाबदारी त्यांच्या हजारो लेकीबाळींनी स्वीकारली व मंदिराचा कळस पूर्ण करण्यासाठी, कलशारोहणासाठी भरभरून आर्थिक निधी पाठवला. लाखो रूपयांचा निधी कलशारोहणासाठी लाभला असून, यानिमित्ताने शुकदास माऊलींच्या हजारो लेकीबाळींनी आपली कृतज्ञता माऊलींच्या चरणी अर्पण केली आहे.
दरम्यान, कलशारोहण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश व राज्यभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता पाहाता, विवेकानंद आश्रमाकडून सर्व तयारी पूर्ण केल्या जात आहे. तसेच, रामनवमीपासून शुकदास माऊलींचे भव्यदिव्य असे समाधी मंदिर भाविकांसाठी खुले होणार असल्याची माहितीही विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष तथा निस्सीम सेवाव्रती अशोकभाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.