– श्रीरामाचा जयघोषाने दुमदुमली साखरखेर्डानगरी!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील श्री गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज संस्थानमध्ये महाराजश्रींचा जन्मोत्सव तथा दासनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. २८ फेब्रुवारीरोजी शेवटच्या दिवशी रामानंद स्वामी आणि श्री प्रल्हाद महाराज यांची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली. भजनी दिंड्या आणि श्रीरामाच्या जयघोषाने साखरखेर्डानगरी दुमदुमली होती.

साखरखेर्डा येथील श्री प्रल्हाद महाराज यांचा १३२ वा जन्मोत्सव सोहळा दि. १५ फेब्रुवारीपासून सुरु झाला होता. दि. १५ ते २१ फेब्रुवारीपर्यंत श्रीमद् ग्रंथराज दासबोध पारायण करण्यात आले. दि. २२ फेब्रुवारीरोजी दासनवमी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंकज किंबहुने यांचे गुलालाचे प्रवचन व दुपारी १२ वाजता गुलाल व पुष्पवृष्टी करण्यात आली. रविवार ते बुधवारपर्यंत विशाल कुलकर्णी, बसु भारव्दाज यांचे प्रवचन तर कैलास खरे, संदीप मांडके, श्यामबुवा धुमकेकर, प्रभंजन भगत, प्रणव जोशी, रामदास आचार्य यांनी कीर्तन सेवा समर्पित केली. दररोज रात्री गायन सेवा अंजली देशपांडे, कल्याण देशपांडे, दत्तप्रसाद पांडे, दिगंबर घुगे, रजत कुळकर्णी, नीरज लांडे यांनी केली. गुरूवारी श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. तर आज सकाळी मंदिरापासून श्री प्रल्हाद महाराज यांच्या निवासस्थानापर्यंत रामानंद स्वामी आणि श्री प्रल्हाद महाराज यांची रथोत्सव मिरवणूक काढण्यात आला. गावातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. महोत्सवात सहभागी दिंड्यांनी मिरवणुकीत रंगत आणली होती. मिरवणुकीनंतर महाआरती व महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र गाडेकाका, उपाध्यक्ष उल्हास देशपांडे व संस्थानचे विश्वस्त सहभागी झाले होते.