– चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे यांचा ‘फार्मर आयडी’स टाळाटाळ करणार्या सीएससी सेंटर, सेतु सुविधा केंद्रचालकांना इशारा
– ‘फार्मर आयडी’ला चिखली तालुक्यात शेतकर्यांचा जोरदार प्रतिसाद; अॅग्रिस्टॅक योजना चिखली तालुक्यात प्रचंड यशस्वी!
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – शेतकर्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने शेतकर्यांना आधार कार्डप्रमाणेच स्वतंत्र डिजीटल ओळखपत्र (फार्मर आयडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. हा फार्मर आयडी तयार करण्यास शेतकर्यांचा जोरदार प्रतिसाद लाभत असून, चिखली तहसीलदार संतोष काकडे स्वतः या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. तथापि, हा फार्मर आयडी तयार करण्यास काही सेतु सुविधा केंद्र व सीएससी सेंटर टाळाटाळ करत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर, आणि त्याचा शेतकर्यांना त्रास होत असल्याने तहसीलदार काकडे यांनी सेतु केंद्र व सीएससी सेंटर चालकांना सज्जड इशारा दिला आहे. फार्मर आयडी तयार करण्यास हयगय केल्यास संबंधित केंद्रांची मान्यता रद्द केली जाईल, अशा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.
सविस्तर असे, की शेतकर्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने शेतकर्यांना आधार कार्डप्रमाणेच स्वतंत्र डिजीटल ओळखपत्र (फार्मर आयडी) देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी या संदर्भातला आदेश जारी करण्यात आला आहे. चिखली तालुक्यात तहसीलदार संतोष काकडे यांच्याहस्ते वळती या गावातून सदर योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत शेतकर्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी महसूल, कृषी व सीएससी केंद्र यांच्यामार्फत शेतकर्यांचा व त्यांच्या शेताचे आधारसंलग्न माहिती संच तयार करण्याचे काम सुरु आहे. चिखली तहसीलदार संतोष काकडे यांनी स्वतः चिखली तालुक्यातील ११ मंडळात अॅग्रिस्टॅकच्या कॅम्पला उपस्थित राहून सदर योजनेचे महत्व लोकांना विषद केले, व फार्मर आयडी तयार करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक व सीएससी केंद्रांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
आजरोजी चिखली तालुक्यात शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद भेटत असल्याचे दिसून येत आहे. उर्वरित शेतकर्यांनी आपल्या गावातील ग्राममहसूल अधिकारी, कृषीसहायक, सीएससी केंद्रांना भेट देऊन आपला फार्मर आयडी तयार करून घेण्याचे आवाहन चिखली तहसीदार संतोष काकडे यांनी केले आहे. तसेच जे सीएससी केंद्र फार्मर आयडी तयार करण्यास हयगय करतील, व ज्या सीएससी केंद्राचे फार्मर आयडी तयार करण्याचे काम समाधानकारक नसेल, त्या सीएससी केंद्राची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारादेखील तहसीलदार काकडे यांनी दिला आहे.