– आमदार दत्तकग्राम योजनेंतर्गत विविध विकास योजना राबविणार
– आमदारांना भेटायला आलेल्या ग्रामस्थ महिलांच्या चेहर्यावर फुलले हसू!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – एकीकडे देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा होत असताना ग्रामीण भागातील काही गावात मात्र अजूनही समस्यांचा पाढा कमी होताना दिसत नाही. अशाच काहीशा विविध समस्यांनी घेरलेले तालुक्यातील मेळजानोरी हे गाव समस्यामुक्त करण्यासाठी मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे.
मेहकर तालुक्यातील मेळजानोरी हे तसे आडवळणाचे व डोंगरात असलेले गाव. तालुक्यापासून या गावाचे अंतर अंदाजे ३० ते ३५ किलोमीटर आहे. या गावात व्यवस्थित रस्ते नाहीत, दर्जेदार शिक्षण नाही, आरोग्याच्या सुविधा नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, यासह विविध समस्या ‘आ’वासून उभ्या आहेत. या समस्यांबाबत मेळजानोरी गावातील विशाल खिल्लारे, सत्यभामा घेवंदे, लता खिल्लारे, कविता खिल्लारे, संगीता मिसाळ, मंगला पवार, अन्नपूर्णा गवळी, निर्मला गवळी, शीलाबाई कंकाळ, नंदा मिसाळ, मनोज मिसाळ, सपना गवई, प्रकाश गवई, सूरज मिसाळसह आदिंची मेहकर येथील विश्रामगृह येथे काल, दि.३१ जानेवारीरोजी आमदार सिद्धार्थ खरात यांची भेट घेऊन गावातील विविध समस्या कथन केल्या. समस्यांचा पाढा ऐकून आमदार सिद्धार्थ खरातही अवाक् झाले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर मेळजानोरी गाव आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. या गावात आता शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येणार असून, गावाचा कायापालट होणार असल्याने आमदाराला भेटल्याचे चीज झाल्याचे समाधान मेळजानोरीवासीयांच्या चेहर्यावर झळकत होते.