– मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्यावर टीकास्त्र!
– स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी घेतली महंत नामदेव शास्त्री यांची भेट; संत भगवानबाबांचे दर्शन घेऊन न्याय मागितला!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – ‘तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन अडीच महिने कोणाला दिसले नाही; आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपले बघावे; दुसर्याकडे डोकावून पाहू नका, स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो, हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळत आहे. एका समाजाला एका बाजूला नेण्याचे काम झाले आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाचे संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील यांनी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांच्यावर टीकास्त्र डागले. मराठा आरक्षणासाठीचे उपोषण स्थगित केल्यानंतर मनोज जरांगे यांनी महंत शास्त्रींवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठराखीवरून टीका केली. दरम्यान, स्व. संतोषबापू देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडावर जाऊन संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले व महंत नामदेवशास्त्री यांची भेट घेऊन आपलीही भूमिका त्यांच्याकडे मांडली. त्यावर महंत नामदेव शास्त्री म्हणाले, की भगवानबाबाला मानणारे देशमुख कुटुंब आहे. जातीय सलोखा या गावात आहे. यापूर्वी किती वेळा गडावर आले, हे त्यांनी दाखवले. भगवान गड तुमच्या पाठीशी कायम राहील, ही ग्वाही देतो. आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले. धनंजय यांचे म्हणणे आहे की, याला जातीयवादाचे स्वरुप देऊ नका. भगवान गड कायमस्वरुपी देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहील. आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहे, ते त्यांनी दाखवले. संतोषअण्णाने किती काम केले हे त्यांनी दाखवले. जातीयवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी, हे गादीवरून सांगणे आहे. आम्ही बसून बोलू. त्यांना दोन घास खाऊ घालू. त्यांना प्रसाद देऊ. संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल, या शब्दांत महंत नामदेवशास्त्री यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आश्वासन दिले.
पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, की तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन अडीच महिने दिसले नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपले बघावे. दुसर्याकडे डोकावून पाहू नका, स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे. जातिवादाचा चौथा नवीन अंक राज्याला पाहायला मिळाला. आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले, जातिवादाचा अंक भयंकर आहे. जातीय सलोखा बिघडला, पण धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला. नामदेवशास्त्री आरोपींचे समर्थन करत आहे. संतोष देशमुख यांची हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल. महाराजांना जे बोलायचे ते बोलून जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरोपींचे जर महंत समर्थन करत असतील तर हे राज्याचे फार मोठे दुर्देव आहे. तसे बोलणे म्हणजे गुंडगिरीला प्रोत्साहन होत आहे. मी त्यांच्यावर बोलू शकत नाही. देशमुख कुटुंबीयांवर जो अन्याय झाला आहे, यावेळी संप्रदाय त्यांना मदत करत असतो. महंत शास्त्री कोणत्याच गुन्हेगारांची पाठराखण करणार नाही. पण जर असे असेल तर भयंकर मोठा विषय आहे. ही राज्याची खूप मोठी हानी आहे. खून केला त्यांचा आनंद आहे की काय? किंवा गुन्हेगारांना सोडून द्या असा त्यांचा अर्थ होतो. महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज धनंजय देशमुख कुटुंबीयांसह भगवानगडावर जाणार आहेत. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुटुंबांने जावे. महाराजांना जे बोलायचे होते ते बोलून गेले. जातीयवादाचा नवीन अंक देऊन गेले, असेही जरांगे पाटील म्हणाले.
———–
महंत नामदेव शास्त्री काय म्हणाले होते?
भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले होते, की संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली त्या आरोपींची मानसिकतादेखील पाहायला पाहिजे होती. त्या आरोपींनादेखील पूर्वी मारहाण झाली होती. हा त्यांच्या गावातील अंतर्गत विषय होता. त्याला मीडियाने मोठे केले. तर भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. तसेच धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नेते नसून राजकीय सुडापोटी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
————
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील गडावरून नामदेव शास्त्रींनी राजकारण करू नये, अशी टीका करून, देशमुख कुटुंबीयच नाही तर मी स्वत: नामदेव शास्त्रींना पुरावे देणार असल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. राजीनाम्याची सतत मागणी होत असताना धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळ यांचीही भेट घेतली होती.