– कॅबिनेट मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण
– स्व. पांडुरंग फुंडकर यांच्यानंतर पुन्हा एकदा खामगावला मंत्रीपद!
खामगाव / बुलढाणा (बाळू वानखेडे) – फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असलेले जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा असताना आज अचानकपणे खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची मंत्रिमंडळात थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली. त्यांच्या या आकाशभरारीनंतर कार्यकर्त्यांत एकच उत्साह संचारला होता. शेकडो कार्यकर्ते नागपूरलादेखील गेले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री पददेखील ना. फुंडकर यांनाच मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. आज रात्रीच त्यांना खाते मिळणार असून, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांची सामान्य स्वयंसेवक ते मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात तिसर्यांदा विजयी झाल्यापासून आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्यावर कौतुकांचा व शुभेच्छांचा वर्षाव होत होता. खामगाव मतदारसंघात त्यांच्या विजयाचा महत्त्वाचा फॅक्टर ठरला तो त्यांच्या मनमिळावू व सर्वसामान्य जनतेचे काम करण्याचा स्वभाव. राष्ट्रीय सेवक संघाचे एक सामान्य स्वयंसेवक ते मंत्रीपदाचा प्रवास मागच्या वीस वर्षाच्या परिश्रमातून साध्य झाला आहे. आकाश फुंडकर यांना स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर मिळालेले मंत्रीपद हे खामगावच्या इतिहासात नवीन मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे. त्यांच्या शपथविधीप्रसंगी नागपूरच्या राजभवनात आकाश फुंडकर यांचे बंधू सागरदादा फुंडकर, वहिनी सौ. अपर्णाताई फुंडकर, पत्नी सौ. स्नेहाताई फुंडकर, सुकन्या औदार्या फुंडकर ह्यादेखील उपस्थित होत्या.
स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेत, बळीराजाच्या विकासासाठी जलयुक्त शिवार व राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामातून संपूर्ण मतदारसंघात जलसंधारण व सिंचनाची मोठमोठी कामे केली. तसेच, राज्याचे कृषिमंत्री असताना स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्यांसाठी कांदा चाळ ही योजना प्रभावीपणे राबवली होती. विशेषतः खामगाव तालुक्यात कांदा चाळीचे जाळेच दिसते. त्यामुळे शेतकरी हा सुखावला असून, आज खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकरी झाले आहेत. मतदारसंघातील मतदारांच्या गोरगरिबांच्या आशीर्वादाने मंत्रीपदी विराजमान झालेले आकाश फुंडकर यांनी सर्वसामान्य जनतेचे आभार मानले. यावेळी खामगांव मतदारसंघासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार; ३९ मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ