गुरे चारण्यासाठी गेलेल्या मायलेकांवर बिबट्याचा हल्ला : ४ वर्षीय बालकाचा मृत्यू
नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र):- सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील सरदारनगर पुनर्वसन गावातील आई आणि मुलगा गायी बकऱ्या चारायला जंगलात गेले होते. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकला ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागासह प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.
सरदारनगर पुनर्वसन येथील बारदा विरसिंग पाडवी ही महिला तिचा 4 वर्षीय मुलगा लकी विरसिंग पाडवी याच्या सोबत जंगलात गायी, बकऱ्या चारण्यासाठी गेली होती दरम्यान लहान मुलगा लकी विरसिंग पाडवी हा सोबत असताना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलातून बिबट्याने सुरुवातीला बकऱ्यांवर हल्ला केला. आई सोडवायला गेली असता तिच्यावरही बिबट्याने हल्ला करताच जीव वाचवत तिने तिथून पळ काढला. मात्र तिचा चार वर्षीय चिमुकला लकी बिबट्याच्या तावडीत सापडल्याने हल्ल्यात जागीच ठार झाला आहे. तर महिला जखमी झाली . या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.