Breaking newsHead linesWorld update

पंतप्रधान माेदींची वृद्ध शेतकर्‍यांना सर्वात मोठी भेट, आता देणार दरमहा ३ हजार रुपये!

नागपूर (ब्रेकिंग महाराष्ट्र) – केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे लवकरच आणखी एक आनंदाची बातमी शेतकर्‍यांना देणार आहे. सद्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतकर्‍यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. तर आता वयोवृद्ध शेतकर्‍यांना दरमहा ३ हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे, वर्षाकाठी पात्र शेतकर्‍यांना ३६ हजार रुपये मिळतील. पीएम किसान मानधन योजना असे या नव्या योजनेचे नाव आहे.
ही नवी योजना गरीब व वृद्ध शेतकर्‍यांसाठी राहणार आहे. त्यासाठी दोन एकरापेक्षा कमी जमीन असलेले शेतकरीच पात्र आहेत. शेतकर्‍यांच्या शेतीसाठी आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून, दोन एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकर्‍यांना या योजनेतून पेन्शन देण्यात येणार आहे. वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकरी या योजनेतून पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. पीएम किसान मानधन योजना सुरू केल्यावर, शेतकर्‍याला दरमहा फक्त ५५ ते २०० रुपये जमा करावे लागतील. हफ्त्याची रक्कम ही शेतकर्‍याच्या वयावर ठरेल. जितक्या लवकर पेन्शन योजनेसाठी नोंदणी केली जाईल, तितका हफ्ता कमी बसेल. ज्या शेतकर्‍यांना, पीएम किसान म्हणजेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपयांच्या अनुदानाचा लाभ मिळतो, ते परस्पर त्या अनुदानातून पीएम किसान मानधन योजनेचा हफ्ता वळता करण्याचा पर्याय निवडू शकतात. त्यामुळे चुकून काही कारणाने हफ्ता भरण्याचे राहून गेल्याने योजनेचा लाभ बंद होण्याची भीती राहणार नाही.
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधारकार्ड, बचत किंवा जनधन बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. पीएम किसान मानधन योजनेसाठी, प्रथम तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. महाराष्ट्रात सेतू केंद्र किंवा आपले सरकार सुविधा केंद्रातही ही सोय उपलब्ध आहे. याशिवाय, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि देशातील निवडक पोस्ट ऑफिस तसेच शेतकरी कर्ज देणार्‍या निवडक बँकेतही नोंदणी करण्याची सोय आहे. कोणत्याही पीएफ, पीपीएफ, ईएसआय अथवा इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेचे सदस्य, लाभार्थी यासाठी पात्र ठरणार नाहीत. याशिवाय, कोणाताही इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर करदाता पात्र ठरू शकणार नाही.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!