मेरा बु. ता. चिखली (प्रताप मोरे) – बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे गेल्या एका वर्षांपासून चिखली पंचायत समितीचा कारभार रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे अनेक कार्यालयीन, अथवा गावांची विकासाची कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांचेही या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असून, कुणीही झेडपी सीईओंना जाब विचारत नाही, असे दुर्देवी चित्र आहे. या पंचायत समितीला कायमस्वरुपी बीडीओ दिल्या जात नसल्याने सर्व तालुका वैतागलेला आहे.
चिखली पंचायत अंतर्गत १४० गावांचा समावेश असून, १४ सदस्यांचे वर्चस्व आहे ही पंचायत समिती वर्ग १, (अ) ची असल्याने दोन बीडीओ कारभार सांभाळत आहेत. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने दररोज पंचायत समितीत खेड्यापाड्यांहून येणार्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच या तालुक्यात वेगवेगळ्या पक्षाचे पक्षनेते मंडळा,r नागरिकांचे कामे करुन देण्यासाठी एकमेकामध्ये स्पर्धा करतात. मात्र या पंचायत समितीला गेल्या एका वर्षांपासून कायमस्वरूपी बीडीओ पदाचे ग्रहण लागल्याने एकापाठोपाठ एका वर्षात आठ प्रभारी बीडीओनी पदभार हाती घेवून काही महिन्यातच सोडून द्यावा लागला. हा प्रकार गेल्या एका वर्षांपासून सुरू असल्याने अधिकारी वर्ग व पदाधिकारी यांना मनस्ताप सहन करून विकासकामे रखडली आहेत.
गेल्या एका वर्षात प्रभारी बीडीओ म्हणून लाभलेले सहाय्यक बीडीओ जायभाये, विस्तार अधिकारी वाघ, देऊळगावराजा येथील बीडीओ इंगळे, मेहकरचे बीडीओ जाधव, बुलडाणा पंचायत समितीचे सहाय्यक बीडीओ भरत हिवाळे यांना रुजू केले , त्यांनी कामकाज सुरळीत चालविले. मात्र त्यांनाही मेहकरचा प्रभार सोपाविला होता, आणि बीडीओ जाधव यांची प्रशासकीय बदली झाली असल्याने त्यांच्या ठिकाणी अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या अचलपूर पंचायत समितीचे बीडीओ सावळे यांच्याकडे चिखली पंचायत समितीचा कायमस्वरूपी पदभार सोपाविला. चिखली पंचायत समितीला कायमस्वरूपी दोन बीडीओ लाभल्याने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. परंतू आता पुन्हा बीडीओ सावळे यांना १५ दिवसांकरिता प्रशिक्षणासाठी बाहेर पाठविण्यात आल्याने देऊळगावराजा पंचायत समितीच्या बीडीओ तेजस्विनी आवळे यांच्याकडे पदभार दिला गेला आहे. मात्र त्यांच्याकडे तात्पुरता प्रभार असल्याने अनेक कामांना अडचणी येत आहेत. अशा या भोंगळ कारभारामुळे जनतेमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
Leave a Reply