– लोकप्रतिनिधींनाही सोयरसुतक नाही, ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त
मेरा बु , ता. चिखली (प्रताप माेरे) : भरपावसाळ्यात काटोडा येथील गावकर्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. खरे तर पाणीटंचाई निर्माण होवू नये, यासाठी तहसील विभाग व पंचायत समितीच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारीवर्ग सतर्क राहतात. मात्र इकडे वीजवितरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत असल्याने काटोडावासीयांना भरपावसातही पिण्याच्या पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, इतकी पाणीटंचाई निर्माण होऊनही प्रशासन ढाराढूर झोपेत असून, लोकप्रतिनिधीही झोपी गेले आहेत. त्यामुळे गावकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
चिखली तालुक्यातील काटोडा या गावालागत मोठे धरण प्रकल्प असून, या तलावातून अंबाशी, रानअंत्री, कवढळ, रोहडा आदी गावांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. काटोडावासीयांना भीषण पाणीटंचाई भासू नये, म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने एक विहीर धरणामध्ये आणि दुसरी विहीर धरणाच्या भिंती खालच्या शेतात खोदकाम करण्यात आली आहे. धरणात पावसाळ्यात विहिरीच्या वर पाणी साठा होत असल्याने गावकरी या विहिरीतील पाण्याचा वापर पाणी पिण्यासाठी करीत नाही. त्यामुळे धरणाच्या भिंती खालच्या विहिरीमधून गावाला दररोज पाणी पुरवठा केल्या जातो. या दोन्ही विहिरीवर एकलारा येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला गेल्या १० महिन्यापासून लाईनमन नसल्याने खाजगी लाईनचे काम करणारे त्याचे काम पाहतात, त्यामुळे गावकरी दररोज पिण्याच्या पाण्यासाठी ओरड करीत आहेत. मात्र ज्यांच्या खांद्यावर गावाची धुरा सोपवली गेली आहे, अशा ग्रामसेविका सौ. डुकरे यांना मात्र या संकटाचे फारसे सोयरसुतक दिसत नाही. त्या चिखली पंचायत समितीमध्येच राहून तेथूनच गावगाडा पाहत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गावकरी त्रस्त झालेले आहेत. तरी संबंधित अधिकारीवर्गांनी तत्काळ दखल घेवून विद्युत पुरवठा सुरळीत करून गावाची भीषण पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी गावकरी करीत आहे.
सरपंच सौ. माधुरी प्रदीप थिगळे यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, काटोडा गावाच्या प्रश्नाबाबत एकलारा येथील वीजवितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता यांना वेळोवेळी फोन लावून माहिती दिल्या जाते. मात्र त्यांच्याकडून नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिल्या जातात. धरणावरील पाणी पुरवठा करणार्या विहिरीसाठी विद्युत पुरवठा शेतातील लाईनवरून जोडलेला आहे, जर गावठाण विद्युत डीपीवरून हा पुरवठा जोडल्यास गावकर्यांना वारंवार खंडित होणार्या विद्युत लाईनपासून सुटका मिळू शकतो, असेही सरपंच यांनी सांगितले.
——–