सिंदखेडराजा (अनिल दराडे) – सिंदखेडराजा तालुका महसूल विभागाच्या पथकाचे खडकपूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करांना दणके देणे सुरूच असून, आज १६ फेब्रुवारीरोजी सकाळी दोन टिप्पर वाहनांवर कारवाई करत रेतीसह टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. महसूल विभागाने ही कारवाई सुरूच ठेवावी, अशी मागणी पुढे आली आहे.
तहसीलदार सचिन जैस्वाल यांचे पथकाला गोपनीय माहिती मिळाली असता सकाळी खडकपूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक होत असून सकाळी तीन वाजता हे टिप्पर नदीपात्रातून मलकापूर पांग्रा रस्त्याने जात आहे. महसूल विभागाच्या पथकाने मलकापूर पांग्रा येथे टिप्पर वाहन क्रमांक एमएच २८ बीबी ७५७७ हे थांबविले असता त्यामध्ये विनापावती तीन ब्रास रेती आढळून आली. तहसीलदार यांच्या पथकाने वाहन चालक गणेश गजानन बुरकुल रा. आगेफळ याला अधिकची माहिती घेतली असता सदर वाहन कारभारी मुरकूट रा . ढोरव्ही ता. सिंदखेडराजा यांचे असल्याचे सांगितले. सदर टिप्पर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४८(७)(८) नुसार कारवाई करीत साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले आहे. तर किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत टिप्पर क्रमांक एमएच २८ बी बी ४१८२ यामध्ये एक ब्रास रेती आढळून आली असता त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक लक्ष्मण माधवराव काटकर हे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करीत होते. सदर वाहनाचे मालक रामेश्वर आश्रुबा भालेकर असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या पथकात तहसीलदार सचिन जैस्वाल, मंडळाधिकारी आनंद राजपूत आणि पटवारी सहभागी झाले होते.
रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई सुरु करुनही रात्रीचा फायदा घेऊन नदीपात्रातून रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरुच आहे. या रस्त्यावरून रात्रीला सुसाट वेगाने ही वाहने धावताना आढळून येतात. येवढेच नाही तर महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करतात. या चोरट्यामार्गाने वाहातूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.