नंदुरबार (आफताब खान) – नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ अतिवृष्टीत मातीचा पूल वाहून गेल्याने १० गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीच्या प्रवाहातून मार्ग काढावा लागत आहे. विशेष बाब म्हणजे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पालक मुलांना खांद्यावर बसवून नदी पार करून शाळेत पाठवत आहे. पूल वाहून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी, अधिकारी पाहणी करून फोटो काढून निघून गेले. परंतु अद्याप दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना खांद्यावर बसा अन् शाळेत जा सरकार काही ऐकणार नाही, असंच काही पालकांना आपल्या पाल्याला म्हणावं लागत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सातपुडा पर्वतरांगेसह नवापूर तालुक्यात पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक गावांचे फरशी पूल तुटून दळणवळणाची सोय बंद झाली आहे. दुर्गम भागात डोंगरदर्याचे रस्ते दुरुस्तीसाठी प्रशासन पोहोचले आहे. मात्र सपाटी भागात नवापूर तालुक्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी केवळ पाहणी करून गायब झाल्याचे चित्र आहे. निमदर्डा गावाजवळ गेल्या उन्हाळ्यात मोठ्या पुलाचे काम सुरू होते. मात्र ठेकेदाराकडून अर्धवट स्थितीत काम बंद केल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दहा गावातील नागरिकांना रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात का होईना सोय उपलब्ध करावी, अशी मागणी केली जात आहे.