औरंगाबाद (विजय चिडे) – पैठण तालुक्यातिल दादेगाव हजारे येथील ह.मु.परभणी कथाकार राजेंद्र दशरथ गहाळ यांची अ. भा. मराठी साहित्य परिषद व वि. वा. शिरवाडकर युवा साहित्य परिषद बेलवंडी बु.ता-श्रीगोंदा, जि. नगर आयोजित 19 वे ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, गंगाधर गाडगीळ, जवाहरलाल दर्डा, के. ज. पुरोहित यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त दिं.२१ जुलै २०२२ रोजी बेलवंडी बू., ता-श्रीगोंदा भैरवनाथ मंदिर येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद्घाटक 95 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक भारत सासणे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. रोहित पवार, आ.निलेश लंके आणि स्वागताध्यक्ष अण्णासाहेब शेलार (मा. उपाध्यक्ष जि. प. नगर) राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते, प्रकाश पाटील (संपादक दै. सकाळ) सुधीर लंके (संपादक लोकमत), अनंत पाटील (संपादक), न्यायमूर्ती वसंतराव पाटील, डॉ. शिरीष लांडगे (अध्यक्ष – अभ्यासमंडळ-पुणे) प्रा. राम कटारे धनेगावकर, मंगेश वाघमारे (पुणे आकाशवाणी) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटनसोहळा, पुरस्कार वितरण सोहळा, परिसंवाद, कविसंमेलन कार्यक्रम होणार आहे. बेलवंडीला संमेलन नगरी करून संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी अविरतपणे कार्य करणारे मुख्य संयोजक अशोककुमार शर्मा यांनी आपल्या बेलवंडीला सारस्वताचा मेळाव्याचे आयोजन दरवर्षी करत आहे. आतापर्यंत झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. आनंद यादव, प्राचार्य शिवाजीराव भोसले, गीतकार जगदीश खेबुडकर, गंगाधर महाबंरे, रामचंद्र देखणे, डॉ.संजय कळमकर यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते निळु फुले, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापुरकर, रमेश देव, सिमा देव, राहुल सोलापूरकर, बंडा जोशी, पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. सुधा कांकरिया, लक्ष्मणराव ढोबळे आदी मान्यवर लाभलेले आहे.
राजेंद्र गहाळ परभणी येथील महात्मा फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कोंडी, दोन एकर, पोशिंदा असे तीन कथासंग्रह प्रकाशित असुन त्यांच्या लेखणास अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. राज्यस्तरीय लोकसंवाद मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, नांदेड, संत जनाबाई मराठी ग्रामीण साहित्य संमेलन, गंगाखेड, अन्य मराठी साहित्य संमेलन, परभणीचे अध्यक्षपद गहाळ यांनी भुषविले आहे. शाळा महाविद्यालये, अ. भा. मराठी साहित्य संमेलनामधुन बहारदार कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम संपन्न झाले आहे. तसेच आकाशवाणी केन्द्रावरुन कथावाचनाचे कार्यक्रम प्रसारित झाले आहे. गहाळ यांची संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. विजयराव गव्हाणे, उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अँड. अशोक सोनी, सचिव दादासाहेब देशमुख, आ. विक्रम काळे, आ. सतिश चव्हाण, साहित्यिक डॉ. आसाराम लोमटे, अजयराव गव्हाणे, विलास पानखडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव रमेश नाईकवाडे आदीसह सर्व मित्र परिवारातुन अभिनंदन होत आहे.