Breaking newsHead linesWorld update

उदगीरच्या कबीर राचुरेने अमेरिकेत रचला इतिहास!

– भारतातील पहिला पोडियम फिनिशर सायकलपटू

– ५ हजार कि. मी. च्या सोलोगटात यशस्वी

– साता समुद्रापार मानाने फडकावला तिरंगा

लातूर (गणेश मुंडे) – साहसी सायकलिंगच्या क्षेत्रात जगभर अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या रेस अक्रोस अमेरिका या सायकल स्पर्धेत उदगीरच्या कबीर रंगा राचुरे या तरुणाने तिसरे स्थान मिळवत,  लातूर जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर झळकावले.  भारताकडून प्रतिनिधित्व करताना वैयक्तिक गटात (सोलो) पोडियम फिनिशिरचा मान मिळविणारा कबीर हा देशातील पहिला साहसी सायकलपटू ठरला आहे.  अमेरिकेच्या दोन ध्रुवांना स्पर्श करणारे हे ५ हजार किलोमिटरचे अंतर कबीरने ११ दिवस ११ तास आणि २५ मिनिटांत पूर्ण करीत यशाला गवसणी घातली.  मानवी क्षमतांची परीक्षा पाहणाऱ्या या साहसी स्पर्धेत सायकलपटूंना अतिउच्च तापमानसह चक्रिवादळापासून ते हाडे गोठविणाऱ्या थंडीचाही सामना करावा लागतो. 

कठोर मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हार न मानण्याच्या प्रबळ विश्वासाच्या बळावर कबीर राचूरे या  ३१ वर्षीय तरुणाने हे यश खेचून आणले आहे.  मुंबई  उच्च न्यायालयात वकीलीच्या व्यवसायात व्यस्त असलेल्या कबीरने सायकलिंगच्या क्षेत्रात २०१६मध्ये प्रवेश केला.  आपल्या अवघ्या ६ वर्षांच्या सायकल करिअरमध्ये त्याने दोन वेळा रेस अक्रॉस अमेरिका (रॅम) या रेसला गवसणी घातली आहे.  यापूर्वीही त्याने २०१९मध्ये रॅममध्ये सहभागी होत हेच अंतर पूर्ण केले होते.  मात्र त्यावेळी कबीरला टॉप -१०मध्ये समाधान मानावे लागले होते. यंदामात्र कबीरने यावरही मात करीत जगातील ३ साहसी सायकलिंगच्या क्षेत्रात पोडियम फिनिशरचा मान पटकावत अमेरिकत भारताचा तिरंगा मानाने फडकावला.

दररोज अवघे दोन तास झोप

रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल स्पर्धा जगभर रॅम नावाने ओळखली जाते. कबीर राचूरेने या सायकल स्पर्धेत आव्हानांवर मात करताना दररोज २२ तासांहून अधिक मेहनत घेतली. दररोज केवळ दोन तास विश्रांती घेत कबीरने शरीरासोबतच मानसिक आव्हानांवरही मात करीत या साहसाला गवसणी घातली. विशेष म्हणजे रॅमच्या तयारीसाठी आपल्यातल्या क्षमता वाढविण्याकरीता त्याने महिनाभर लेह- लदाख या डोंगराळ भागात सराव केला.

अमेरिकेतल्या १३ राज्यांमधून प्रवास

रेस अक्रॉस अमेरिका ही सायकल स्पर्धा लॉस एजिलिस पासून सुरू होते. यात सहभागी होणाऱ्या साहसी सायकलपटूंना वॉशिंग्टन डिसीपर्यंत या दोन ध्रुवांना जोडणारे ५ हजार किलोमिटरचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असते. अमेरिकेतील १३ राज्यांमधून होणाऱ्या या सायकलस्पर्धेत सायकलपटूंना प्रसंगी चक्रिवादळ, हिमवर्षाव, भाजून काढणारे वाळवंटी वातावरण, सर्वोच्च शिखरे, हाडे गोठविणारे उणे तापमान अशा सर्वच खडतर मार्गामधून सायकल चालवावी लागते. यात रॅमच्या पहिल्या दिवसापासूनच आव्हानांना सुरुवात होते. पहिल्या दोन टप्प्यात एरिझोना या वाळवंटी भागातून अंग भाजून काढणाऱ्या ५० डिग्री सेल्सिअसच्या तापमानाचा सामना करत ९०० किलोमिटर सायकलिंग करावी लागते. दुसऱ्या टप्प्यात उष्णतेतून अगदी विरुद्ध हाडे गोठविणाऱ्या उणे तापमानाशी झुंज देत सायकलपटूंना कोलोरॅडोमधून पुढे मार्गक्रमण करीत ८०० किलोमिटर अंतर पार करावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!