उद्धव ठाकरे मैदानात उतरणार; ऑगस्टमध्ये महाराष्ट्र पिंजून काढणार!
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पहिलाच राज्यव्यापी दौरा
– औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारची स्थगिती
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सावरलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता पुन्हा जोमाने पक्ष बांधणी करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते राज्याच्या दौर्यावर ‘मातोश्री’बाहेर पडणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार आहेत. महाराष्ट्र हा शिवसेनेला मानणारा असून, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या पाठीत खुपसलेला खंजीर महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला आहे. हा महाराष्ट्र पुन्हा एकदा ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहील, अशी अटकळ राज्यातील जाणकार व्यक्त करत आहेत. तसेच मी अजून मैदान सोडले नाही, मी मैदानात आहे हे दाखवण्यासाठी हे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच उद्धव ठाकरे या दौर्यात तरुणाईला आकर्षित करतानाही दिसून येतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णायाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील नाव देण्याचा निर्णय शेवटच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतला होता. या नामांतराच्या निर्णायाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही त्याला स्थगिती देणे योग्य नाही. या प्रस्तावाला स्थगिती केवळ श्रेयवादासाठी आहे, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. यावेळी त्यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे पेन घेऊन एकनाथ शिंदे यांना लिहून देतात आणि त्यांना बोलायला लावतात हे योग्य नाही, असा घणाघातही त्यांनी केला.
——