ChikhaliCrimeHead linesMEHAKARVidharbha

वडगाव माळीच्या शेतकर्‍याची सवडद शिवारात दगडाने ठेचून निर्घृण हत्या

– खुनाचा उलगडा करण्याचे साखरखेर्डा पोलिसांसमोर आव्हान!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – वडगाव माळी येथील केशव भुतेकर (वय ६०) या शेतकर्‍याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.२७) सकाळी मेहकर तालुक्यातील लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावरील सवडद शेतशिवारात उघडकीस आला. आज सकाळी शेतकरी शेतात जात असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. ही बाब साखरखेर्डा पोलिसांना कळवताच, मृतकाची ओळख पटविण्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर आवाहन केले होते. त्यानुसार हा मृतदेह केशव भुतेकर (रा.वडगाव माळी) यांचा असल्याचे स्पष्ट झाले. या निर्घृण खुनाचे कारण गुलदस्त्यात असून, याप्रकरणी एका रिक्षा चालकाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

नेहमीप्रमाणे सवडद गावातील शेतकरी हे सकाळी शेतात कामावर चालले होते. यावेळी एका शेताजवळ अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचलेला मृतदेह त्यांनी पाहिला. त्यांनी याबाबत गावकर्‍यांना आणि पोलिसांना माहिती दिली. सदर व्यक्ती कोण आहे? आणि त्याची हत्या कुणी आणि का केली? याबाबत दिवसभर परिसरात चर्चा सुरू होती. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार काळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मृतदेह ताब्यात घेऊन अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले होते. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी भेट दिली व तपासासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार, सकाळीच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्रे फिरवले असता, मृतक इसमाची ओळख पटली. मृतक हा साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडगाव माळी येथील केशव भुतेकर (वय ६०) असून, एक दोन दिवसांपासून घरून निघून गेल्याची बाब तपासात समोर आली. पोलिसांनी आणखी तपास केला असता, एका रिक्षा चालकावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला तातडीने ताब्यात घेऊन साखरखेर्डा पोलिस त्याची चौकशी करत आहेत. या घटनेने साखरखेर्डा परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!