बंडखोरांची आमदारकी धोक्यात, अपात्रतेची कार्यवाही सुरु!
– मुंबईतील बंडखोरांच्या कार्यालयावरही हल्ले, महानगरीत कलम १४४ लागू
– बंडखोर नेते एकनाथ शिंदेंकडून समर्थक ३८ शिवसेना आमदारांची यादी जाहीर
– शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार आहे – खा. संजय राऊत
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, राज्यभर बंडखोरांच्या कार्यालयांना निशाणा करत हल्ले चालू होते. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुणे व उस्मानाबाद येथील कार्यालय फोडण्यात आले. मुंबईतील बंडखोरांच्या कार्यालयांवरही हल्ले करण्यात आले. हे लोण राज्यभर चोहीकडे पोहोचण्याची शक्यता पाहाता, गृहमंत्रालयाने तातडीने सर्व राजकीय कार्यालयांना पोलिस संरक्षण पुरवले आहे. आमच्या समर्थक आमदारांची सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली असून, या आमदारांच्या कुटुंबीयांना जर काही झाले तर त्याला उद्धव ठाकरे, शरद पवार व संजय राऊत हे जबाबदार असतील, असा इशारा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तर कोणत्याही आमदारांची सुरक्षा काढण्यात आली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, १६ बंडखोरांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचिका शिवसेनेने दाखल केली होती. त्या याचिकेवर विधानसभेच्या उपसभापतींनी संबंधित बंडखोर आमदारांचे सोमवारपर्यंत म्हणणे मागवले आहे. तसेच, उपसभापतींविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव प्रस्तावदेखील फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाला जोरदार झटके बसण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत, मंगेश कुडाळकर यांचे कार्यालय फोडण्यात आल्यानंतर नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. साकीनाका येथे दिलीप लांडे यांचे पोस्टर फाडले गेले. त्यामुळे संपूर्ण राज्यात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. काल मुंबईला येण्याची घोषणा करणार्या एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी सोडण्याचे मात्र टाळले आहे. काल ते अचानक गायब झाले होते. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस हेदेखील आठ ते दहा तासांची अचानक गायब होते. त्यामुळे आज दुपारी एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेतली व त्यांना पुढील रणनीतीचे मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक ३८ शिवसेना आमदारांची यादी जाहीर केली. स्वतंत्र शिवसेना गट स्थापन करण्यासाठी शिंदे यांना ३७ आमदारांचीच गरज असून, त्यादृष्टीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परंतु, कायदेशीरदृष्ट्या शिंदे हे शिवसेना गटनेते नसल्याने त्यांना असा गट स्थापन करता येत असला तरी, त्याला वैधानिक मान्यता मिळते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, शिवसेना कार्यकारी मंडळाची बैठक शिवसेना भवन येथे सुरु झाली असून, या बैठकीला माजी मंत्री अनंत गिते व रामदास कदम हे गैरहजर असल्याचे सूत्राने सांगितले आहे. एकनाथ शिंदे गटाला झटका देत, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर बंडखोर आमदारांकडून सोमवारपर्यंत खुलासा मागवला आहे. ज्या आमदारांविरुद्ध शिवसेनेने अपात्रतेची कारवाई करावी, अशी शिफारस केली आहे, त्या आमदारांनी आपले म्हणणे सोमवारी ५ वाजेपर्यंत दाखल करावेत, असे उपसभापतींनी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता बंडखोर आमदार काय म्हणणे दाखल करतात, याकडे राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.