वर्धा (प्रकाश कथले) – समुद्रपूर तालुक्यातील जाम ते वरोरा मार्गावरील गणेशपूर नंदोरी शिवारातल्या चोरडिया कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कापसाला दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने किमान १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिनिंग मालकाच्या म्हणण्यानुसार, आगीमुळे झालेले नुकसान दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिनिंगच्या आवारात ठेवलेल्या कापसाच्या गंजीतून धुराचे लोळ दिसताच आग विझविण्याकरीता धावपळ सुरू झाली. पण पाहता पाहता कापूस भरलेल्या वाहनातील कापसानेही पेट घेतला. यात एपी ०१ टीए ०५०८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये भरून असलेला कापूस जिनिंगच्या आवारात उतरवून घेण्याकरीता थांबविण्यात आला होता. या ट्रकमधील कापसानेही पेट घेतला. ट्रकमधील कापसावर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला. तातडीने या वाहनातील काही कापूस उतरवून घेण्यात आला. दरम्यान, जिनिंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेतील अग्निशमन यंत्रणेची मदत मागविण्यात आली. रात्री उशिरा़पर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. जिनिंगमध्ये आतापर्यंत खरेदी करून साठविलेला कापूस जळाल्याचे सांगण्यात आले. सुमारे पंधराशे ते दोन हजार क्विंटल कापूस जळाल्याचे जिनिंग मालक सोहेल यांच्याकडून सांगण्यात आले. या आगीत अनुचित घटना घडली नसली तरी ही आग आटोक्यात आणण्याकरीता मोठा प्रयत्न अग्निशमन दलाकडून केला जात आहे. सायंकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता.
जिनिंग मालकाने ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचवेळी जिनिंगमध्ये कापसाला लागलेल्या आगीच्या कारणाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. घटनास्थळाची काहींनी पाहणी करून कापसाला लागलेली आग ट्रकच्या सायलेंसरमधून निघालेल्या ठिणगीने लागल्याचेही सांगण्यात आले. मात्र जिनिंग मालकांकडून ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. चोरडिया कॉटन इंडस्ट्रिजमध्ये कापसाची खरेदी सुरु आहे. आजपर्यंत अंदाजे २ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली असावी. दुपारी कापसाच्या गंजीतून धूर निघाल्याचे दिसले. त्यामुळेच कापसाला आग लागल्याचे लक्षात आले. आगीत काही प्रमाणात जळालेल्या ट्रकवर विष्णू ट्रान्सपोर्ट, आदिलाबाद लिहिले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मत चतुर यांनी जिनिंगमध्ये जाऊन चौकशी केली. समुद्रपूर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.
——————