अमर पाटील यांच्याकडे सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभांची जबाबदारी!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षामध्ये खांदेपालट होत असून, अमर पाटील यांच्याकडे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी सोपविण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अमर पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि चार विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्याकडील जबाबदारी आता शिवसेनेकडून कमी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या चार विधानसभा मतदार संघापैकी सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट हे दोन विधानसभा मतदारसंघ काढून दक्षिण सोलापूरचे युवक नेते व माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांच्याकडे देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीकडून घेण्यात आला आहे.
बरडे यांच्याकडे आता सोलापूर शहरातील शहर उत्तर आणि शहर मध्य या दोन मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमर पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून इच्छुक असल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येते. सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी एकूण चार जिल्हाप्रमुख होते. आता अमर पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पाचवा जिल्हाप्रमुख मिळाला आहे. शिवसेनेने बरडे यांच्याकडीलच दोन तालुके कोणत्या कारणासाठी काढून घेतले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी आता बरडे शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभा मतदार संघावरच जातीने लक्ष ठेवणार आहेत. तसेच पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संभाजी शिंदे यांच्याकडे सांगोला, पंढरपूर शहर व माळशिरस तालुक्याची जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आहे. धनंजय डिकोळे हे माढा आणि करमाळा तालुक्याचे जिल्हाप्रमुख आहेत. गणेश वानकर हे मोहोळ, बार्शी, मंगळवेढा शहर व तालुका आणि उत्तर सोलापूरचे जिल्हाप्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत.
अमर पाटील यांना संधी
अमर पाटील हे दक्षिण सोलापूरचे असून त्यांना दक्षिण व अक्कलकोट तालुक्यात काम करायला सोपे जाणार आहे. त्यामुळेच अमर पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पुरुषोत्तम बरडे यांचे कामही चांगले आहे. आणि संघटनसुद्धा चांगले आहे. त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा चांगली आहे. त्यांच्याकडे लोकसंग्रहसुद्धा चांगला आहे .त्यामुळे आणखी पदाधिकार्यांना काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने पाटील यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची नवीन जबाबदारी पक्षाच्या आदेशानुसार देण्यात आली असल्याची माहिती सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सांगितले.
पावसाळी छत्रीसारखे शिवसेनेचे काम नाही!
शिवसेनेचे काम हे बाराही महिने सुरू असते. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना काम करत नाही. २४ तास काम करणारी संघटना म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. निवडणुका बघून काम करणार्या पक्षासारखे शिवसेनेचे काम नाही. अर्थात पावसाळी छत्रीसारखे शिवसेनेचे काम नाही. तर २४ तास १२ महिने शिवसेना काम करत असते. शिवसेना तळागाळात जाऊन काम करणारी संघटना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी कशी आणि कोणासोबत आघाडी होते, त्या अनुषंगाने तिकीट वाटपाचे नियोजन तर होईलच, परंतु आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ७ ते ८ आमदार निवडून येण्याची शक्यता संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी वर्तविली आहे.
—————