-सिंदखेडराजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची भेट; मदतीसाठी कोणी अडवणूक करीत असेल तर थेट फोन करण्याचे आवाहन
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी ४ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, बामखेड आणि रताळी येथे भेट देऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन केले. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी कोणी अधिकारी अडवणूक करीत असेल, तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आश्वासन त्यांनी यावेळी कुटुंबीयांना दिले.
महाराष्ट्रात ५५ लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असताना आतापर्यंत केवळ २४ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. त्यापैकी फक्त १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर पैसे जमा झाले आहेत. हा शासनाचा नाकर्तेपणा नाही तर काय, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी रताळी येथील एका शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित केला. कर्जमाफीच्या यादीत रताळी येथील केवळ ७० शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आणि त्यांच्या खात्यांवर पैसे कधी जमा होणार, असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. २६ सप्टेंबर रोजी रताळी येथील आकाश बळीराम पाटील (वय २४) या शेतकरी पुत्राने शेतातील पळसाच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केली होती. आमदार रोहित पवार यांनी बळीराम पाटील यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून आजपर्यंत कोणती मदत मिळाली, तसेच मदत मिळण्यास विलंब का झाला, याबाबत जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना फोन करून विचारणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीचा सामना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे खचून न जाता आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत. घरातील कर्ता पुरुष गेल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. संपूर्ण महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेत असताना अनेक वास्तव समोर येत आहेत. अशा कुटुंबांच्या मदतीला धावून जाण्याची आज गरज असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. साखरखेर्डा येथील संतोष खरात आणि गोविंदराव बेंडमाळी यांनीही आत्महत्या केली होती. त्यांच्या घरी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली आणि सांत्वन केले. साखरखेर्डा गावात जाताना त्यांनी थेट सरपंच अमित जाधव यांच्या मोटारसायकलवर बसून विविध ठिकाणी भेटी दिल्या. रात्रीचे ११ वाजले असतानाही शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी रोहितदादा आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात आठ आमदार, खासदार, मंत्री आणि माजी मंत्री असताना एकही लोकप्रतिनिधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आला नाही, अशी प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्यानंतर लोकांशी संवाद साधण्याची हातोटी रोहितदादा पवार यांच्याकडे असल्याचेही अनेक शेतकऱ्यांनी नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रेसंजित पाटील, सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख सतीश काळे, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती राजू ठोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती अनिल तुपकर, अमित जाधव, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफीक, योगेश नाईक, डॉ. ज्योतीताई खेडेकर, आयुब कुरेशी, दिलीप बेंडमाळी, श्रीकांत पऱ्हाड, शुभम राजपूत, वामन नाईक, रमेश नन्हई, ज्ञानेश्वर मुदमाळी, माधव नाईक, गणपत अवचार, भानुदास लव्हाळे, माजी सरपंच सौ. अलका लव्हाळे, सरपंच उषा पाटील, समाधान पाटील, दिलीप सोभागे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, प्रेसंजित पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य काटे, दिलीप खंडारे, सिंदखेडराजा विधानसभा संपर्कप्रमुख सतीश काळे, माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सभापती राजू ठोके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश शेजूळ, माजी सभापती अनिल तुपकर, अमित जाधव, माजी सरपंच कमलाकर गवई, उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफीक, योगेश नाईक, डॉ. ज्योतीताई खेडेकर, आयुब कुरेशी, दिलीप बेंडमाळी, श्रीकांत पऱ्हाड, शुभम राजपूत, वामन नाईक, रमेश नन्हई, ज्ञानेश्वर मुदमाळी, माधव नाईक, गणपत अवचार, भानुदास लव्हाळे, माजी सरपंच सौ. अलका लव्हाळे, सरपंच उषा पाटील, समाधान पाटील, दिलीप सोभागे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.